Labour-Work
Labour-Work 
युथ्स-कॉर्नर

दिल तो बच्चा है! : आयुष्याचं दुखणं उपासणारा बिगारी

नितीन थोरात

गाडीला किक मारताना कंबर चमकली. बाम लावूनही दोन दिवसांपासून दुखणं थांबत नव्हतं. त्यात दुसऱ्या दिवशी गाडीवर दीड तास प्रवास करायचा होता. तो सहन होईल का, असा विचार करत वाळूच्या ढिगावर बसलेलो. तोच पंचवीस वर्षाचा एक पोऱ्या मुरुमाचा ढीग खोऱ्यानं सपाट करत असल्याचं दिसलं. मोठमोठी दगडी उचलून तो लांब टाकत होता. घमाल्यात मुरुम भरून तो खड्ड्यात टाकत होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याची चपळाई पाहून आपलं वय झालंय, असं क्षणभर मनात येऊन गेलं. परंतु, पुन्हा मनाची समजूत घातली. ‘पोरगा तरुण आहे. सळसळतं रक्त आहे. लग्नबिग्न झालेलं नसणार. लेकराबाळांच टेंशन नसंल. त्यामुळं एवढ्या उत्साहानं काम करत असणार. आपल्यासारखं टेन्शन थोडीच त्याच्यामागं असेल तेव्हा? आपल्यामागं संसार आहे. आईबाबांची जबाबदारी आहे. पोरगा अजून लहान आहे. त्यामुळं आपल्या मानसिकतेचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच की. मी त्याच्या वयाचा असतो, तर मीही वाळूचा ट्रक एकट्यानं रिकामा केला असताच की.’ मनाची समजूत घातली तसं गालावर हसू उमललं. 

कंबरेवर हात ठेवत उभा राहिलो आणि त्या पोराजवळ गेलो. त्यानं माझ्याकडं लक्षच दिलं नाय. म्हणालो, ‘नाव काय रं तुझं?’ कपाळावरचा घाम पुसत स्मित करत म्हणाला, ‘गोविंद नावहे साहेब माझं.’ ‘कुठल्या गावचाहे तू?’ माझ्या या प्रश्‍नावर लांबवर हात करत म्हणाला, ‘जालण्याचाहे साहेब.’ मी पुढं काही बोलणार तोच त्यानं मुरूम भरायला सुरुवात केली. दोन चार घमेल्याच्या खेपा टाकून झाल्यावर तो झाडाखाली बसून पाणी पिऊ लागला. त्याच्याजवळ गेलो आणि कंबरेवर हात टेकवत खाली बसलो. 

तसा तो म्हणाला, ‘साहेब कंबर चमकलीया का काय?’ ‘व्हय ना राव. गाडीला किक मारताना अचानक कळ निघाली. डोक्‍याला थोडा ताण असतोय का आमच्या? मग असं काय ना काय दुखणं उद्भवत असतंच की. तुझं बरंहे बाबा. राब राब राबायचं आणि रात्री निवांत झोपायचं. कसलं ते डोक्‍याला टेन्शनच नसंल ना तुझ्या?’ पुन्हा एकदा गोविंदनी स्मित केलं आणि म्हणाला, ‘व्हय साहेब आज रात्री निवांत झोपणार बघा. काल रात्री जालन्यावरनं गाडीत बसलो. बायको आन दोन पोरीबी सोबत होत्या. थोरली पोरगी दोन वर्षाचीहे, तर धाकटी २१ दिवसांची. त्यामुळं रात्रभर झोपलो नाय.’ त्याच्या उत्तरानं कंबरेतली वेदना जास्तच जाणवायला लागली. 

तसा म्हणालो, ‘बारक्‍या, पोरीला कशाला आणायचं हिकडं. तुझं तू एकटच यायचं ना काम करायचं होतं तर?’ ‘साहेब, आई-वडील नाय ना मला. अन्‌ बायकुबी आजारी असती. म्हणून हिकडं सासुरवाडीला आलो. सकाळी सातला घरी पोचलो. तर आठ वाजता मावसभाऊ म्हणाला येतो का बिगारी काम करायला. कपभर चहा घेतला अन्‌ निघालो. आता रात्री घरी गेल्यावर जेवण करंल आणि निवांत झोपलं बघा मी.’

गोविंदाने स्मित केलं अन्‌ पुन्हा खोरं हातात घेऊन मुरमाच्या भल्यामोठ्या ढिगावर उभा राहिला. रात्रभर झोपला नाही. अन्नाचा एक कण नाही. दोन पोरींची जबाबदारी, आजारी बायकोची जबाबदारी. तरीही त्याच्या चेहऱ्यावर मोहक स्मित होतं. हिमतीच्या खोऱ्यानं तो आयुष्याचं दुखणं उपसत होता. निराशेचा खड्डा आनंदानं भरत होता. मी मात्र एक हात कंबरेवर आणि एक हात कपाळावर ठेवून त्याच्या उत्साहाकडं पाहत होतो. त्याच्या हिमतीसमोर हरलो होतो...

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT