Saina Nehwal
Saina Nehwal Sakal
युथ्स-कॉर्नर

ऑन स्क्रीन : सायना : ‘फुलराणी’चा हुकलेला ‘स्मॅश’

महेश बर्दापूरकर barmahesh@gmail.com

सायना नेहवाल या सेलिब्रिटी महिला भारतीय बॅडमिंटन खेळाडूवरचा अमोल गुप्ते दिग्दर्शित बायोपिक ‘सायना’ तिच्या देदीप्यमान व अनेक चढ-उतार असलेल्या कारकीर्दीची गोष्ट सांगतो. मात्र, कथा सायनाचा संघर्ष, कष्ट, जिद्द दाखवण्यात कमी पडते व प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर त्यापासून घेण्यासारखं काही आहे, असं अजिबात वाटत नाही. इथंच हा चित्रपट फसतो. त्याव्यतिरिक्त प्रसंगांतील तोच तोपणा, मुख्य कलाकारांची चुकलेली निवड यांमुळं चित्रपट हवा तो ‘स्मॅश’ मारण्यात अयशस्वी ठरतो.

बायोपिक मांडताना व खेळाडूची कारकीर्द उलगडून दाखवताना त्याची मेहनत, संघर्ष, कष्ट व शेवटी अद्वितीय यश हा प्रवास किती उत्कंठावर्धक पद्धतीनं मांडला जातो, याला मोठे महत्त्व असते. मेरी कोम, धोनी, सचिन यांच्या बायोपिकमध्ये हे टप्पे विस्तारानं, मनोरंजक पद्धतीनं मांडले गेले. या आघाड्यांवर ‘सायना’ खूपच कमी पडतो. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या व नैसर्गिक खेळाडू असलेल्या सायनावर (परिणिती चोप्रा) लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळण्यासाठी दबाब असतो. तिची आई उषाराणी (मेघना मलिक) या बाबतीत खूपच आग्रही असते व सायनानं जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावं यासाठी मेहनत घेते. सायनाला राजन (मानव कौल) हा खेळाडूंवर मोठे कष्ट घेणारा प्रशिक्षक मिळतो आणि तलवारीप्रमाणे रॅकेट चालवणारी सायना तुफान वेगानं प्रगती करू लागते. राष्ट्रीय स्तरावर नाव कमावते, जगातील एक नंबरची बॅडमिंटनपटू बनते, ऑलिंपिक कांस्यपदकही मिळवते. तिच्यामुळं अनेक मुला-मुलींना बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळते.

चित्रपटाची कथा एका सरळ रेषेत प्रवास करते. सायनाचं करिअर घडत असताना तिचा आपल्या प्रशिक्षकाशी असलेला संघर्ष हाच काय तो चित्रपटातील उत्कंठावर्धक भाग ठरतो. (इथंही पी. गोपीचंद यांचं नाव घेणं का टाळण्यात आलं, याचा उलगडा होत नाही.) सायना एखादी मॅच खेळण्यासाठी जाते, कधी थोडाफार संघर्ष होतो आणि ती सामना जिंकते याचप्रकारचे अनेक प्रसंग समोर घडताना पाहण्याशिवाय प्रेक्षकांपुढं काही पर्याय दिग्दर्शक ठेवत नाही. सायनाचा प्रियकर कश्यप (ईशान नक्वी) याच्याबरोबर राहिल्यास कारकिर्दीवर परिणाम होईल, असं तिचा प्रशिक्षक सांगतो. यावेळी सायना ‘सचिन २२व्या वर्षी लग्न करतो, मला मात्र प्रियकर निवडण्याचाही अधिकार नाही,’ असं (आपल्याच प्रियकराला) सुनावते. असे प्रसंग सायनाची कथा अधिक बेचव करतात. सायनाच्या करिअरकडं पाहून अनेक मुलं बॅडमिंटन खेळायला सुरुवात करतात व तिच्याप्रमाणं कपडे, हेअरस्टाइल करू लागतात, हे सांगणारा प्रसंग मात्र छान जमून आला आहे. मध्येच सायनाला झालेली दुखापत, तिच्या करिअरवर मीडियानं आक्रस्ताळपणानं केलेली वक्तव्यं, त्याचा तिच्या आई-वडिलांना होणार त्रास असे टप्पे दाखवत एकाच संथ लयीत या कथेचा शेवट होतो. अमाल मलिक यांच्या संगीताची थोडीही छाप पडत नाही व बॅकग्राउंडला वाजणाऱ्या अनेक गाण्यांपैकी एकही लक्षात राहात नाही.

सायनाची भूमिका प्रथम श्रद्धा कपूर करणार होती. परिणिती चोप्राची या भूमिकेसाठीची निवड खूपच चुकल्यासारखी वाटते. सायनच्या देहयष्टीपासून देहबोलपर्यंत प्रवास साकारताना तिची दमछाक झाल्यासारखी वाटते. (कोर्टवर बॅडमिंटन खेळातानाचे तिचे फक्त क्लोजअप सगळं काही सांगून जातात.) प्रशिक्षकाबरोबर संघर्षाच्या प्रसंगांमध्ये तिचा अभिनय थोडा खुलतो. मानव कौलच्या वाट्याला आलेली भूमिका छान आहे, मात्र कथेच्या ओघात तिचं महत्त्व कमी होत जातं. इतर कलाकारांनी फारशी संधी नाही.

एकंदरीतच, फुलराणी ही ओळख मिळालेल्या सायना नेहवालच्या देदीप्यमान कारकीर्दीवरचा हा ‘ॲमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित बायोपिक दुर्दैवानं अगदीच आउट ऑफ कोर्ट गेला आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT