युथ्स-कॉर्नर

दिसायला देखणे अन्‌ करणीला हेकणे! 

नितीन थोरात

नगरला निघालेलो. चंदननगर बायपासला येऊन एसटीची वाट पाहत थांबलो. एसटी आली तसा पटकन आतमध्ये शिरलो. पाठीमागच्या बाजूला उजव्या बाजूच्या सीटवर एक सुंदर पोरगी बसलेली. तिनं शेजारी सॅक ठेवली होती. 

बरोबर तिच्या शेजारच्या डाव्या बाजूच्या सीटवर एक पुरुष बसलेला. त्याच्याही बाजूला बॅग. आता प्रश्‍न असा होता, की पोरीशेजारी बसावं की पुरुषाशेजारी? भले मी विवाहित असो, भले माझं माझ्या बायकोवर प्रेम असो,  सुंदर पोरगी दिसल्यावर पुरुष थोडा विरघळतोच. तसा मीही विरघळलो. असं वाटलं, त्या पोरीशेजारी बसावं. म्हणून मी तिच्याकडं पाहत दोन पावलं पुढं आलो. तोच तिनं बाहेर पाहतच स्वत:च्या बॅगवर हात ठेवला. पोरींना सिक्‍स्थ सेन्स असतो, याचं हे उदाहरण. म्हणजे, मी एसटीत चढलो तेव्हापासून ती खिडकीच्या बाहेर पाहत होती. मी तिला पाहिलं, ती सुंदर असल्याचं माझ्या मनात आलं. तिच्याशेजारी बसावं वाटलं आणि बसायला निघालो हे सगळं तिला बाहेर पाहत असतानाच समजलं होतं आणि तिनं बॅगेवर हात ठेवत मला शेजारी न बसण्याचा इशाराही केला होता! मी तोंड वाकडं करत दुसरीकडं जाणार, तोच तिला कोण साक्षात्कार झाला माहिती नाही. तिनं बॅग उचलून मांडीवर घेतली आणि मला बसायला जागा दिली. मी हॅंडसम आहे, चांगला आहे, छान दिसतो म्हणून मला जागा दिली असणार, असं मनात आलं. गोड स्मित करत मी तिच्याशेजारी बसत माझ्या मागची माणसं पाहिली, तर माझ्यामागं दोन चार बेवडी आणि टवाळ पोरं होती. त्या बेवड्यांपेक्षा तू परवडला, या भावनेनं तिनं मला जागा दिली होती. तोंड वाकडं करत, भुवयांचा आकडा करत मी तिकीट काढलं आणि प्रवास सुरू झाला. 

एसटी फुल भरलेली. काही अंतरावरच एसटीत दोन चार बाया चढल्या. खरंतर त्या बायांना जागा देण्याचं माझ्या जिवावर आलं होतं; पण आपल्यात थोडीफार माणुसकी असतेच की. आधीच गाडीत टवाळ लोकं, त्यात पोरगी शेजारी असल्यावर इंप्रेशन मारायचा चान्स कोण सोडणार? म्हणून मी उठणार होतोच. तोच ती पोरगी म्हणाली, ‘तुम्ही जरा उठता का, त्या बाईंना शेजारी बसू दिलं असतं?’ ती असं म्हणाल्यामुळं मी किती चांगला आहे, हे दाखवण्याची संधी गेली होती. उलट ती असं म्हणाल्यामुळं मी स्वत:हून उठलो नसून, त्या शेजारच्या पोरीनं मला उठवलं, असाही अर्थ निघाला होता. मागचे पुढचे लोक माझ्याकडं संशयानं पाहू लागले. मी त्या पोरीची बसल्या बसल्या छेड काढत होतो की काय, असा प्रश्‍नही त्याच्या डोळ्यात दिसू लागला; पण शांत राहिलो. करणार तरी काय? त्या बेवड्यांमध्ये उभा राहिलो. आता मला माझ्यात आणि त्या बेवड्यात फार फरक वाटत नव्हता. उशिरा केलेलं सत्कर्म हे दुष्कर्मासारखं असतं, असं वाटू लागलं.

दीड तास तसाच ताटकळत उभा राहिलो. गाडी एका हॉटेलवर थांबली. सगळे उतरले. मीही उतरलो. चहा-पाणी घेऊन गाडीत आलो, तर ती पोरगी आरडाओरडा करू लागली. तिची पर्स कुणीतरी घेऊन गेलं होत. तसं तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, ‘मॅडम, तुम्ही मला उठवून त्या बायांना बसायला सांगितलं. पण, लक्षात घ्या सगळेच पुरुष वाईट नसतात.’ आपण काहीतरी साउथच्या पिक्‍चरमधला डायलॉग मारलाय, असं फिल होत होतं. तेवढ्यात, तिच्या शेजारी बसलेली बाई वरती आली. तिच्या हातात बॅग होती. तशी ती बाई त्या पोरीला म्हणाली, ‘ये पोरे, अशी पर्स ठेऊन खाली जात्यात व्हय? कुणी नेली असती म्हणंजी? आजूबाजूला बघतीये ना कशे बेवडे बिवडे भरलेत. दिसायला देखणे आणि करणीला हेकणे.’

प्रवास सुरू झाला. विशेष म्हणजे, मला आता गाडीचा आवाजसुद्धा येत नव्हता न् बेवड्यांच्या दारूचा वासही. बेवड्यांसारखा मीही झुलत होतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT