‘पप्पा मला आमरस खायचाय. आंबे आणा ना...’ लेक असं म्हणाला आणि लगेच पिशवी घेऊन घराबाहेर पडलो. आपण एवढा पैसा कमावतोय तो कुणासाठी? लेकरांसाठीच ना? त्यांची हौस मौज पूर्ण केलीच पाहिजे. या सुखद विचारांचा पाऊस मनात पडू लागला. बाहेर आलो तर भयानक ऊन. टुव्हीलरवर जावं का फोरव्हीलरमध्ये, हा विचार मनात आला आणि फोरव्हीलरमधनं जावं हे उत्तरही समोर आलं. आपण कार घेतली ती काय देखाव्यासाठी? वापर केलाच पाहिजे की, असा विचार करत कारमध्ये बसलो. एसी चालू केला. क्षणात गार हवा गळ्याला चिकटू लागली. सुख म्हणजे आणखी काय असतं, असा विचार करत निघालो मंडईकडं.
वाटेत परप्रांतीय लोक दिसत होते. प्रत्येकाच्या हातात कसलातरी पांढरा कागद. यांना आपापल्या राज्यात जायचंय. त्यासाठी सरकारनं मेडिकल टेस्ट सुरू केली आहे. हा त्याचाच कागद असणार, असा विचार केला आणि त्यांच्याकडं दुर्लक्ष करत एसी वाढवला. परप्रांतीय कडक उन्हात पाय तोडत होते आणि मी गार हवेत सावलीला बसून आमरसाची स्वप्न पाहत होतो. नेमका रोडच्या बाजूला आंबेवाल्याचा टेम्पो दिसला. पाचशे रुपयाच्या दोन कडक नोटा त्याच्या हातावर टेकवल्या. पेटी घेतली आणि घराकडं निघालो.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
परप्रांतीयांची वर्दळ सुरुच होती. कुणी लेकराला खांद्यावर घेतलेलं, कुणाच्या बायकांनी चार चार बोचकी खांद्याला अडकवलेली. झपाझप पावलं टाकत ती आपापल्या घराकडं निघालेली. भर उन्हात त्या लोकांनी केलेली गर्दी पाहून डोकं फिरलं. राहायचं पुण्यातच, तर कशाला उन्हातान्हात तडफडायला जातायेत घराकडं काय माहिती? असा विचार करत मोठमोठ्यानं हॉर्न वाजवू लागलो. सुकलेल्या चेहऱ्याची लोकं माझ्याकडं पाहून रस्ता देत होती. एकाच्याही चेहऱ्यावर चिडचिड नव्हती. होती तर ती फक्त हतबलता. पण, त्यांची हतबलता पाहून मी माझा मुड का खराब करायचा? दुर्लक्ष करत मी आंब्याच्या गोड सुगंधाचा आस्वाद घेऊ लागलो. सुख याहून काय निराळं असेल? एसीची थंडगार हवा, हापूस आंब्याचा मधुर गंध आणि टेपवर सुरू असलेली जुनी गाणी. त्याक्षणाला मी जगातला सगळ्यात सुखी माणूस असेल. पण, माझ्या सुखाला कुणाची तरी नजर लागली आणि कडक उन्हात गाडीचं चाक पंक्चर झालं.
गाडीत स्टेपनी नव्हती. आता घरी जायचं कसं ? लॉकडाउनमुळं गॅरेज बंद. पंक्चर काढणार कशी? मित्राकडची स्टेपनी मागवावी, असा विचार आला. पण, तो येणार कधी, मी घरी जाणार कधी, लेकराला आमरस खाऊ घालणार कधी असे विचार मनात आले आणि घराकडं पायी जाण्याचं ठरवलं. दुपारचे साडेबारा वाजलेले. घर दीड किलोमीटरवर. गाडी सावलीला लावली आणि डोक्याला रुमाल बांधून आंब्याची पेटी खांद्यावर घेतली. शंभरेक पावलं चाललो आणि कधी त्या परप्रांतीयाच्या लोंढ्यात सामील झालो मलाही समजेना.
कुणी कुणाशी बोलत नव्हतं की हसत नव्हतं. घाम पुसत अवंढा गिळत जो तो झपाझप पावलं टाकत होता. कुणाला गारवा नको होता, की आंब्याच्या गंधाचा मोह नव्हता. कुणाला गारवा नको होता की टेपची गाणी नको होती. प्रत्येकाला फक्त स्वत:च्या घरी पोचायचं होतं. एसी, आंबे, गाणी सारं काही दुय्यम वाटू लागलं. आंब्याच्या पेटीचं ओझं वाटू लागलं. आता फक्त माझं घर हवं होतं. कारण घर किती महत्त्वाचं असतं हे रस्त्यावर आल्यावर समजतं...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.