
गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांच्या वेतनात आणि इतर पेमेंटमध्ये 38 टक्के वाढ झाली आहे.
मुंबई - आर्थिक वर्ष 2019 - 20 मध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्या बँकर्समध्ये एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांच्या वेतनात आणि इतर पेमेंटमध्ये 38 टक्के वाढ झाली आहे. यानंतर त्यांचे वेतन 18.92 कोटी रुपये इतकं झालं आहे. एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. बँकेनं त्यांच्या वार्षिक अहवालात सांगितलं की, आर्थिक वर्षात पुरी यांनी त्यांच्या स्टॉकच्या पर्यायाचा लाभ घेत 161.56 कोटी रुपयांची कमाई केली.
आदित्य पुरी यंदा ऑक्टोबर महिन्यात निवृत्त होणार आहेत. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये स्टॉकमधून त्यांनी 42.20 कोटी रुपयांची कमाई केली. बँकेच्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, ग्रुप हेड सशिधर जगदीशन यांना आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 2.91 कोटी रुपये वेतन मिळालं आहे. असाही दावा केला जात आहे की, पुरी यांच्यानंतर जगदीशन यांनाच एचडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक केलं जाऊ शकतं.
हे वाचा - 80 वर्षांच्या आजीबाईंचे स्विस बँकेत खाते; काळ्या पैशाच्या स्वरुपात नावावर भली मोठी रक्कम
एचडीएफसी बँकेशिवाय देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापकिय संचालक आणि सीईओ संदीप बख्शी यांना गेल्या वर्षी 6.31 कोटी वेतन मिळालं होतं. आयसीआयसीआय बँकेनं त्यांच्या वार्षिक अहवालात याची माहिती दिली आहे. बख्शी यांना ऑक्टोबर 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. यानंतर 2019 च्या आर्थिक वर्षात त्यांना 4.90 कोटी रुपये वेतन मिळालं होतं.
Axis बँकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांना 2020 च्या आर्थिक वर्षात 6.01 कोटी रुपये वेतन मिळालं. याआधीच्या वर्षात शेवटच्या तीन महिन्यांसाठी त्यांना 1.27 कोटी रुपये वेतन देण्यात आलं होतं. Axis बँकेच्या रिलेट हेड प्रलय मंडल यांना 2020 वर्षात 1.83 कोटी रुपये वेतनापोटी मिळाले. त्यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला आहे. एचडीएफसी आणि एस बँकेत काम करणाऱ्या प्रयल मंडल यांनी काम केलं आहे. आता ती सीएसबी बँकेचे प्रमुख होऊ शकतात असंही म्हटलं जात आहे.
हे वाचा - महाराष्ट्र ते केरळ, चार राज्यांतून प्रवास करत 1 वर्षाने पोहोचला ट्रक
कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकिय संचालक उदय कोटक यांचे वेतन गेल्या वर्षी कमी झाले. कोटक महिंद्रा बँकेत त्यांची 26 टक्के भागिदारी आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये उदय कोटक यांना 2.97 कोटी रुपये वेतन देण्यात आलं होतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे वेतन 18 टक्के कमी आहे. 2019 मध्ये त्यांना 3.52 कोटी रुपये वेतन मिळालं होतं.