esakal | परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा... घरबसल्या!
sakal

बोलून बातमी शोधा

investment in mutual funds

परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा... घरबसल्या!

sakal_logo
By
सुहास राजदेरकर

भारतातील शेअर बाजार तेजीत असला तरीही भारताबाहेरील बहुतेक शेअर बाजारांनी आपल्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी केल्याचे दिसून येते. आज जग आपल्या हातांमध्ये सामावले आहे. ॲमेझॉन, फेसबुक, नेटफ्लिक्स, पेपल, व्हिसा, वॉल्ट डिस्ने, ॲस्ट्रा झेनिका अशा मातब्बर परदेशी कंपन्यांमध्ये आपलीही गुंतवणूक असावी, असे वाटणे साहजिक आहे. पैसे जास्त लागतील किंवा गुंतवणुकीमध्ये क्लिष्टता असेल म्हणून बहुतेक जण अशी गुंतवणूक टाळतात. परंतु, काही म्युच्युअल फंडांनी अशा प्रकारच्या योजना बाजारात आणल्यामुळे ही गुंतवणूक सहजसोपी झाली आहे.

ॲक्सिस ग्लोबल फंड ऑफ फंड, आयसीआयसीआय ग्लोबल ॲडव्हांटेज फंड, निप्पॉन इंडिया जपान, यूएस इक्विटी फंड आदी योजना बाजारात आलेल्या आहेत. अशा योजनांमध्ये कमीतकमी गुंतवणूक फक्त पाच हजार रुपये असते. या (फंड ऑफ फंड) योजना ‘डेट’ विभागामध्ये मोडत असल्यामुळे गुंतवणूकदारांना त्यानुसार प्राप्तिकराचा लाभ मिळतो, तर परतावा मात्र ‘इक्विटी’ विभागानुसार मिळतो. ‘लॉक इन पिरियड’ नसतो आणि पैसे काढायचे असल्यास अर्ज केल्यावर सात दिवसांमध्ये ते आपल्या बँक खात्यात जमा होतात. दीर्घकाळामध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घटण्याची शक्यता जास्त असल्याने, गुंतवणूकदारांना अधिक फायदा मिळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे अशा योजनांसाठी डि-मॅट खात्याची आवश्यकता नसते.

हेही वाचा: चर्चा ‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’ची!

नवी योजना कशी आहे?

नुकतीच कोटक म्युच्युअल फंडाने देखील अशाच प्रकारची, ‘कोटक ग्लोबल इनोव्हेशन फंड ऑफ फंड’ ही नवी योजना (एनएफओ) आठ जुलैपासून बाजारात आणली आहे. ही पण एक ‘फंड ऑफ फंड’ योजना आहे. या योजनेत जमा झालेले पैसे, वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंड या योजनेमध्ये गुंतविले जाणार आहेत. संधी असलेल्या सर्व देशांमध्ये, सर्व विभागांमध्ये; तसेच लार्ज, मिड व स्मॉल कॅप अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या निवडक ४० ते ५० शेअरमध्ये गुंतवणूक, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

वेलिंग्टन ही ९० वर्षांचा इतिहास असलेली एक बलाढ्य गुंतवणूक कंपनी असून, ती अमेरिका, युरोप आदी ६० देशांमधील विविध गुंतवणूकदारांचे साधारणपणे ९८ लाख कोटी रुपये सांभाळत आहे. कंपनीमध्ये ८९६ गुंतवणूकतज्ज्ञ कार्यरत असून, त्यांना सरासरी १७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. कंपन्या निवडतांना विशेष लक्ष दिले जाणार आहे, जेणेकरून या कंपन्या तांत्रिक; तसेच कोविड-१९ सारखी इतर कोणतीही आव्हाने पेलण्यास सक्षम असतील.

हेही वाचा: निकालांच्या हंगामात नफ्याचा पाऊस, जाणून घ्या कोणत्या शेअर्स,सेक्टर्सचे नशीब चमकणार...

जोखीम काय आहे?

जगामधील सर्वच शेअर बाजारांमध्ये चढ-उतार होत असल्यामुळे, अस्थिरतेची जोखीम आहेच. लार्ज कॅपच्या तुलनेत, मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये जोखीम जास्त असते. अपेक्षेनुसार, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत, आपला रुपया न घसरता, जर वधारला तर गुंतवणूकदारांना त्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. एखाद्या देशाने त्यांच्या आर्थिक; तसेच इतर धोरणांमध्ये बदल केल्यास, त्यानुसार जोखीम वाढू शकते.

हेही वाचा: दररोज 416 भरा अन् कोट्यधीश व्हा; जाणून घ्या योजनेबद्दल

तात्पर्य
गुंतवणूक कालावधी तीन वर्षांहून अधिक असेल, तर आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या साधारण १० टक्के गुंतवणूक ही अशा योजनांमध्ये करायला हरकत नाही.

वेलिंग्टन ग्लोबल इनोव्हेशन फंड

योजनेची स्थापना फेब्रुवारी २०१७

सर्वांत जास्त गुंतवणूक असलेला विभाग इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, २६ टक्के

योजनेची सर्वांत जास्त गुंतवणूक असलेला देश नॉर्थ अमेरिका, ७३ टक्के

योजनेने दिलेला परतावा

१ वर्ष २ वर्षे ३ वर्षे

३९ टक्के ३९ टक्के २५ टक्के

(लेखक म्युच्युअल फंडाचे अनुभवी सल्लागार आहेत.)

loading image