आता 'हिंदुस्थानी राखी'मुळं चीनला बसणार 4000 हजार कोटींचा फटका

सुशांत जाधव
Wednesday, 15 July 2020

या मोहिमेला देशभरातील 40 हजारहून अधिक संघटना आणि या महासंघाचे 7 कोटीहून अधिक सदस्य सहभागी होतील, असा दावाही किरकोळ व्यापारी महासंघाने केला आहे. 'भारतीय सामान, हमारा अभिमान' असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

देशातील किरकोळ व्यापाऱ्यांचा महासंघ म्हणजेच कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने यंदाचा रक्षाबंधन उत्सव 'हिंदुस्थानी राखी' याअंतर्गत साजरा करण्याची तयारी सुरु केली आहे. या निर्णयामुळे चीनला जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा फटका बसेल, असा दावाही भारतातील किरकोळ व्यापारांच्या महासंघाने केलाय. यासह सीमारेषवर तैनात असलेल्या जवानांना 5,000 राख्या पाठवण्यात येणार आहेत. 3 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन साजरे करण्यात येणार आहे. यावेळी 'हिन्दुस्तानी राखी उत्सव' या स्वरुपात देशभरात सण साजरा करण्याचा मानस व्यापारी महासंघाने आखला आहे. 

चीन-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका

किरकोळ व्यापारांच्या महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनसाठी राखी किंवा राखीसाठी आवश्यक कोणताही कच्चा माल चीनकडून खरेदी करणार नसल्याचे महासंघाने म्हटले आहे. सीमारेषेवर तैनात असलेल्या जवानांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे 5000 राख्या देण्यात येतील. महासंघेच्या महिला शाखेकडून संबंधित राख्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत. याशिवाय देशातील लष्करी रुग्णालयातील जवान आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना देखील महासंघाशी संलग्नित असलेल्या महिला प्रत्यक्ष जाऊन राखी बांधणार असल्याची माहितीही व्यापारी महासंघाने दिली आहे.   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या मोहिमेला देशभरातील 40 हजारहून अधिक संघटना आणि या महासंघाचे 7 कोटीहून अधिक सदस्य सहभागी होतील, असा दावाही किरकोळ व्यापारी महासंघाने केला आहे. 'भारतीय सामान, हमारा अभिमान' असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. दरवर्षी रक्षाबंधनच्या निमित्ताने जवळपास  6 हजार  कोटी रुपयांचा व्यवसाय होतो.  यात चीनी कंपन्यांचा व्यवसाय हा भारतापेक्षा अधिक म्हणजे 4 हजार कोटींच्या घरात व्हायचा. व्यापारी महासंघाने घेतलेल्या निर्णयामुळे चीनला आणखी एक दणका बसणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china trade war boycott chinese goods cait prepares to rakshabandhan festival china would lose 4000 crore business