मोठी बातमी : दोन हजारांच्या नोटा बंद होणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची एकही चलनी नोट छापली नसल्याची आकडेवारी माहिती अधिकाराअंतर्गत करण्यात आलेल्या एका अर्जातून समोर आली आहे. 

नवी दिल्ली : बॅंकांकडून एटीएम मशीनमध्ये 2,000 रुपयांच्या नोटांऐवजी 500 रुपयांच्या अतिरिक्त नोटांचा पुरवठा करण्यासंदर्भात तांत्रिक सिद्धता केली जाते आहे. जरी रिझर्व्ह बॅंकेकडून किंवा इतर कोणत्याही संबंधित यंत्रणेकडून यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, मोठ्या चलनाच्या नोटांवर बाजारात नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांचाच हा एक भाग असावा अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॅंकांद्वारे एटीएम मशीनमध्ये 2,000 रुपयांच्या नोटांसाठी असलेल्या खाचा बदलून तिथे 100 रुपये किंवा 200 रुपयांच्या चलनी नोटांसाठीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएममध्ये असलेल्या 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये आणि 2,000 रुपयांच्या खाचांपैकी चौथ्या खाचांमधून 2,000 रुपयांच्या चलनी नोटांची व्यवस्था काढून तिथे छोट्या चलनी नोटांसाठीची व्यवस्था केली जाते आहे.

- देशात रोखीलाच प्राधान्य; रिझर्व्ह बॅंकेचा अहवाल

देशभरातील एटीएमध्ये हा बदल केला जात असून ही प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल, असे एका इंग्रजी संकेतस्थळावरील एका अहवालात म्हटले आहे. मागील आठवड्यात इंडियन बॅंकेने एटीएममधून 2,000 रुपयांच्या चलनी नोटांचा पुरवठा बंद करत असल्याची माहिती दिली होती.

सर्वसामान्य नागरिकांना 2,000 रुपयांच्या चलनी नोटांचा व्यवहारात वापर करताना अडचणी येत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे बॅंकेचे म्हणणे आहे. 1 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र बॅंकेच्या शाखांमधून मात्र 2,000 रुपयांच्या चलनी नोटा दिल्या जाणार आहेत.

- टेनिस 'सौंदर्यसम्राज्ञी' मारिया शारापोव्हाचा टेनिसला अलविदा!

8 नोव्हेंबर 2016 ला केंद्र सरकारने जुन्या 500 रुपये आणि 1,000 रुपयांच्या चलनी नोटांवर बंदी आणल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने 2,000 रुपयांच्या चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या.
2016-17 मध्ये रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या 354.30 कोटी नोटा छापल्या होत्या. 2017-18 मध्ये दोन हजार रुपयांच्या 11.15 कोटी नोटा, तर 2018-19 दोन हजार रुपयांच्या 4.67 कोटी नोटा रिझर्व्ह बॅंकेने छापल्या होत्या.

- भारत अग्रगण्य डिजिटल समाज बनणार - मुकेश अंबानी​

चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची एकही चलनी नोट छापली नसल्याची आकडेवारी माहिती अधिकाराअंतर्गत करण्यात आलेल्या एका अर्जातून समोर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Bank stops loading ATM with Rs 2000 notes