
* फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रकरणावर होणार सुनावणी
* पंजाब नॅशनल बॅंक प्रकरणातील गुन्हेगार
* सध्या नीरव मोदी इंग्लंडमधील वॅंड्सवर्थ तुरुंगात
* आवश्यकता भासल्यास न्यायालय करणार व्हिडिओ लिंकने सुनावणी
फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या प्रकरणावर इंग्लंडच्या न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या २ अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणात नीरव मोदीवर गैरव्यवहार आणि मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. नीरव मोदी सध्या इंग्लंडमधील तुरुंगात आहे. भारतीय तपास यंत्रणांनी नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याची मागणी इंग्लंडच्या न्यायालयात केलेली आहे. ४९ वर्षीय नीरव मोदीला मागील वर्षी मार्चपासून लंडनच्या नैऋत्येला असणाऱ्या वॅंड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आलेले आहे.
लंडनमधील वेस्टमिस्टर मॅगिस्ट्रेटच्या न्यायालयात सुनावणीसाठी नीरव मोदीला हजर करण्यात येणार आहे. नीरव मोदीच्या भारताकडे होणाऱ्या प्रत्यार्पणसंदर्भात ही सुनावणी होणार आहे. सोशल डिस्टंसिंगचे निकष लक्षात घेऊन नीरव मोदीला व्हिडिओ लिंकद्वारेदेखील सादर केले जाऊ शकते. लॉकडाऊनमुळे इंग्लंडमधील न्यायालयातसुद्धा विविध निकषांचे पालन केले जाते आहे. नीरव मोदीवरील पाचदिवसीय सुनावणी सोमवारपासून सुरू होत आहे. भारत सरकारने इंग्लंड सरकारकडे मागील वर्षी नीरव मोदीचे प्रत्यार्पण भारताकडे करण्याची विनंती केली होती.
नीरव मोदीवर सेंट्रल बुरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि सक्तवसूली संचालनालयाने गुन्हे दाखल केलेले आहेत. पंजाब नॅशनल बॅंकेची फसवणूक करत नीरव मोदीने गैरव्यवहार केला आहे. शिवाय मनी लॉंडरिंगचाही वापर केला आहे, असा गुन्हा नीरव मोदीवर नोंदवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दोन आणखी गुन्हे नीरव मोदीवर नोंदवण्यात आलेले आहेत. पुराव्यांना नष्ट करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे हे गुन्हेसुद्धा सीबीआयने नोंदवले आहेत.
भारत सरकारने इंग्लंडच्या क्राऊन प्रोसेक्युशन सर्व्हिसकडे पत्र लिहून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. भारत सरकारने लेखी स्वरुपात अनेक उत्तरे पाठवली असल्यामुळे या प्रकरणातील सुनावणी लवकर आटोपता येईल असे क्राऊन प्रोसेक्युशन सर्व्हिसने म्हटले आहे. कोविड-१९ महामारीचा परिणाम न्यायालयाच्या सुनावणी आणि कामकाजावर झाला आहे. नीरव मोदीकडून सहा साक्षीदार सादर केले जाण्याची शक्यता आहे. यात दागिन्यांचे तज्ज्ञ याशिवाय कायदेशीर आणि तुरुंगविषयक तज्ज्ञांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात नीरव मोदीने जामीनासाठी पाचवा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. नीरव मोदीला १९ मार्च २०१९ ला अटक करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.