मोठी बातमी : पाण्यापेक्षा स्वस्त झालंय कच्चं तेल; दर 18 वर्षांच्या नीचांकी पातळीवर!

Crude-Oil
Crude-Oil

नवी दिल्ली : 'कोरोना'मुळे जगभरातील नागरी आणि औद्योगिक हालचाल ठप्प झाल्यामुळे जगभरात कच्च्या तेलाची  मागणी घटली आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया आणि रशिया या प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये सुरु असलेले 'प्राईस वॉर'मुळे कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या 18 वर्षांच्या म्हणजेच 2002 च्या नीचांकी पातळीवर जाऊन पोचल्या आहेत. 

सोमवारी ब्रेंट क्रूडचे दर  8.7 टक्क्यांनी घसरून 22.76 डॉलर प्रति बॅरलवर पोचले होते. तर टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ऑइल 6.6 टक्क्यांनी घसरून 20.09 डॉलर प्रति बॅरलवर घसरले होते. परिणामी ब्रेंट आणि टेक्सस क्रूड ऑइल अनुक्रमे नोव्हेंबर 2002 आणि फेब्रुवारी 2002च्या  पातळीवर आले होते. मंगळवारी किंमतीत किंचित सुधारणा झाली.

मागणीत घट सुरूच

'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने जगभरातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मते, जूनपर्यंत परिस्थिती कायम राहण्याची आहे. दुसरीकडे जगभरातील मानवी हालचाल देखील मंदावल्याने दररोज लागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत देखील कमालीची घट झाली आहे.

दरयुद्ध

कच्च्या तेलाच्या उत्पादन कपातीवर सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात एकमत न झाल्याने सौदी अरेबियाने आणखी उत्पादन वाढविल्याने अतिरिक्त पुरवठा निर्माण झाला आहे.  मागणीत मात्र घट सुरूच कच्च्या तेलाच्या किंमती नीचांकी पातळीवर  पोचल्या आहेत. सद्यस्थितीत इंधनाच्या वापरात जागतिक पातळीवर प्रतिदिन 30 दशलक्ष बॅरलची घट झाली आहे. म्हणजेच एकूण तेलाच्या मागणीत एक तृतीयांश घट झाली आहे.  
 
अमेरिकेचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न :

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांच्यात सोमवारी तेलाच्या किंमतीवर चर्चा झाली. तसेच अमेरिकेचे माईक पोम्पिओ आणि सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या गेल्या महिन्यात चर्चा झाली. जागतिक इंधन बाजारात स्थिरता राहावी यासाठी अमेरिकेचे दोन्ही देशांमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

भारताला फायदा :

भारत जगातील दुसरा सर्वांत मोठा तेल आयातदार देश आहे. देशाला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी 80 टक्के इंधन भारत आयात करतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने भारताच्या आयात बिलात घट होणार आहे.

कच्चे तेल पाण्यापेक्षा स्वस्त एक लीटर कच्च्या तेलाचे दर हे एक लीटर बाटलीबंद पाण्याच्या किंमतीपेक्षा खाली आले आहेत. सध्याच्या दरानुसार क्रूड ऑईलच्या एका बॅरलची किंमत 1500 ते 1800 रुपया दरम्यान आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर कच्च्या तेलाचा समावेश होतो. म्हणजेच एका लीटर कच्च्या तेलाचे दर हे 9.43  ते 13 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com