रुपया घसरला! तेल, सोने, चांदी महाग; युद्धाचे भारतावर असे होत आहेत परिणाम

सेन्सेक्स १ हजार ४९१ तर निफ्टी ३८२ अंशांनी कोसळला
Share Market
Share Marketsakal media

मुंबई : रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. काल झालेली चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ ठरली आहे. या युद्धाचे परिणाम या दोन्ही देशांवर होत आहेतच मात्र, या युद्धात थेट सहभागी नसलेल्या इतर देशांवरही त्याचे विपरित परिणाम होताना दिसत आहेत. खासकरुन कोरोनामुळे आर्थिक आघाड्यांवर आधीच कंबरडं मोडलेलं असताना पुन्हा एकदा या युद्धामुळे असेच परिणाम दिसून येत आहेत. भारतीय चलन रुपयाची देखील घसरण झाली आहे.

रुपयाची घसरण

परकीय चलन बाजारात काल डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ७६.८५ असा उघडला होता, मात्र नंतर तो घसरून ७७.०१ पर्यंत गेला. कालच्यापेक्षा तो ८४ पैशांनी घसरला. युद्धामुळे डॉलर, सोने आदी सुरक्षित घटकांची खरेदी गुंतवणूकदार करीत असल्याचे रॅलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेवा यांनी सांगितले. लवकरच रुपया ७७.५० पर्यंत जाईल, तर मध्यम कालावधीत तो ७९ पर्यंतही कोसळू शकतो, असेही त्या म्हणाल्या. शेअरबाजारात, तसेच सर्वत्र परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याने डॉलर, सोने महागत असून शेअरबाजार कोसळत चालला आहे.

तेल, सोने, चांदी महाग

नवी दिल्लीमध्ये काल २४ कॅरेट एक तोळे (१० ग्रॅम) सोन्याचा भाव १ हजार २९८ रुपयांनी वाढून तो ५३ हजार ७८४ रुपयांवर पोहोचला. सोन्याचा रविवारी दर ५२ हजार ४८६ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही काल सोन्याचे दर चढेच राहिले. चांदीचा भावही काल १ हजार ९१० रुपयांनी वाढून ७० हजार ९७७ रुपयांवर गेला. रविवारी हा भाव ६९ हजार ०६७ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही काल सोन्याचा भाव प्रति औंसाला १ हजार ९९६ अमेरिकी डॉलर एवढा झाला. चांदीचा दर औंसाला २५.८१ एवढाच राहिला. काल कच्च्या तेलाचे भावही प्रति पिंपामागे १२५.८५ डॉलरपर्यंत वाढले. कालच्या तुलनेत त्यात काल ६.५५ टक्के वाढ झाली.

Share Market
रशियन तेलावर बंदी घालताना कच खातेय अमेरिका; कारण देताना म्हटलं...

रशिया-युक्रेन युद्धामुळे काल पुन्हा शेअर बाजाराला फटका बसला. जगभरातील बहुतांश बाजार काल गडगडले होते, भारतीय बाजारामध्येही त्याचे पडसाद उमटले. ‘निफ्टी’ १६ हजारांखाली तर सेन्सेक्स ५३ हजारांखाली गेला. सेन्सेक्स १ हजार ४९१ अंशांनी तर ‘निफ्टी’ ३८२ अंशांनी कोसळला. हे दोन्ही निर्देशांक आज सात महिन्यांच्या नीचांकी स्तरावर गेले होते. कालच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या शेअरचे मूल्य ५.६८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले.

‘बीएसई’वरील सर्व शेअरचे एकूण मूल्य शुक्रवारी २४६.८ लाख कोटी रुपये होते, ते काल २४१.१ लाख कोटी रुपयांपर्यंत रोडावले; तर फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांच्या सर्व शेअरचे मूल्य २९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. २ फेब्रुवारी रोजी ते २७० लाख कोटी रुपये होते. आतापर्यंत हे निर्देशांक साधारणपणे पंधरा टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत. गेल्या तीन दिवसांतच सेन्सेक्स ३ हजार ४०४.५३ अंश म्हणजेच ६.०५ टक्क्यांनी कोसळला होता. आज परकी गुंतवणूकदारांनी बँकांच्या शेअरची जोरदार विक्री केली, त्याचबरोबर वाहन उद्योग व रिअल्टी क्षेत्राचे शेअरही कोसळले.

Share Market
शांतता चर्चची तिसरी फेरीही निष्फळ; युक्रेनने अमेरिकेला म्हटलं, 'निव्वळ तोंडी...'

कच्चे तेल महागले रुपया घसरला

जागतिक बाजारात कच्चे तेल व नैसर्गिक वायू विकण्यास रशियावर युरोप व अमेरिका निर्बंध लादतील, अशी चर्चा आज सुरू झाली. त्यामुळे युरोपचा नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होईल तसेच कच्च्या तेलाचे दर वाढल्याने सर्वत्र चलनवाढ व महागाई होईल, या शक्यतेने आज युरोपीय शेअरबाजार एक ते दोन टक्के तर आशियासह भारतीय शेअर बाजारही सव्वादोन ते पावणेतीन टक्क्यांनी पडले. कच्चे तेल आज १२५ डॉलरच्या पुढे तर रुपयाही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७७.०१ अशा सर्वकालिक नीचांकी स्तरावर गेल्याने या भीतीमध्ये भर पडली.

अशीही घसरण

आज सेन्सेक्समधील ३ हजार ५९५ शेअरपैकी ७४ टक्के म्हणजे २ हजार ६८४ शेअरचे भाव घसरले; तर २१ टक्के म्हणजे ७८३ शेअरचे भाव वाढले. १२८ शेअरचे भाव तेच राहिले. आज रुपयाची घसरण झाल्याने फक्त आयटी क्षेत्राचे शेअर बऱ्यापैकी मजबूत राहिले. सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी फक्त एअरटेल (६७५), एचसीएलटेक (१,१५३), टाटा स्टील (१,२९१) व इन्फोसिस (१,७३९) हे चारच शेअर १६ ते २२ रुपयांच्या पट्ट्यात वाढले. उरलेले २६ शेअर तोटा दाखवीत बंद झाले,तर निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३८ शेअर नुकसानीत बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com