शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्सवर टायटनची एकाकी झुंज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 January 2020

  • टायटनची एकाकी झुंज
  • रुपया घसरला
  • कच्च्या तेलाचे भाव 70 डॉलरवर
  • ​सोने सात वर्षांच्या उच्चांकीवर

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा स्वीकारत शेअर विक्रीला प्राधान्य दिल्याने सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. परिणामी मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 787.98 अंशांनी घसरून 40,676.63 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 233.60 अंशांनी घसरून 11993.05 वर बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराणवरील निर्बंध आणखी कडक करण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला. परिणामी सोमवारी सकाळी शेअर बाजार चालू होताच जोरदार शेअर विक्रीला सुरुवात झाली. अमेरिका आणि इराणमधील संघर्षात प्रामुख्याने आशियाई देश होरपळले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसे काढून घेतील असा अंदाज विश्लेषक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणुकीचे 'सेफ हेवन' समजल्या जाणाऱ्या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.

दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान अन् ११ फेब्रुवारीला निकाल

आज दिवसभरात बीएसई आणि एनएसई वरील सर्वच निर्देशांक नकारात्मक व्यवहार करून बंद झाले. बँकिंग क्षेत्राबरोबरच कच्च्या तेलाच्या दराशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या विमान वाहतूक कंपन्या, पेंट्स कंपन्या, ऑइल आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सर्वाधिक पडझड झाली. तर डॉलरच्या तुलनेत रुपया  घसरल्याने आयटी क्षेत्रातील कंपन्या देखील नकारात्मक व्यवहार करून बंद झाल्या.

पाकिस्तानचा मोठा कट उधळला; गुजरात ATSची कारवाई

टायटनची एकाकी झुंज
सेन्सेक्सचा विचार करता, टॉप 30 कंपन्यांचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सवरील टायटन वगळता सर्वच कंपन्यांचे शेअर नकारात्मक व्यवहार करून बंद झाले. त्यातही बजाज फायनान्स, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी, मारुती सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर सर्वाधिक घसरले होते.

रुपया घसरला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलर वधारल्याने रुपयाचे 40 पैशांनी अवमूल्यन झाले. परिणामी दिवस अखेर रुपया 72.03 वर व्यवहार करून बंद झाला. शेअर बाजारातील घसरण आणि डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाला झळ बसत आहेत. 

कच्च्या तेलाचे भाव 70 डॉलरवर
अमेरिका - इराण संघर्षाचा सर्वाधिक परिणाम म्हणून कच्च्या तेलाचे भाव शुक्रवारपासून तब्बल 6 टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. त्यामुळे ब्रेंट क्रूड 70 डॉलरवर तर वेस्ट टेक्सस क्रूड ऑइल 64 डॉलरवर पोचले आहेत. तर लवकरच हे भाव 75 डॉलरवर पोचतील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

सोने सात वर्षांच्या उच्चांकीवर
अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.  जागतिक कमोडिटी बाजारात स्पॉट गोल्ड 1.4 टक्क्यांनी वाढून 1573 डॉलर प्रति औसवर पोचले आहे. तर अमेरिकी बाजारात गोल्ड फ्युचर्समध्ये 1.6 टक्क्याची वाढ झाली असून सोन्याचा भाव 1577.80 डॉलर झाला आहे. परिणामी सोने मागील सात वर्षांच्या उच्चांकीवर पोचले आहे. 10 एप्रिल 2013 नंतर सोन्याचा हा जागतिक बाजारातील आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. तर भारतीय वायदे बाजारात सकाळच्या सत्रात सोने 41 हजार 96 रुपयांपर्यंत वाढले होते. तर मागील दोन सत्रात सोन्यामध्ये तब्बल 1800 रुपयांनी वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex plunges 788 points Nifty finishes below 12000 bank financials auto bleed