बोलू कौतुके... मन-माणूस जोडू

Nitin Banugade Patil
Nitin Banugade Patil

तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, संकटात सापडायचे नसेल, अनेकांचे सहकार्य मिळवायचे असेल, मनस्वी आनंद नि समाधान साधायचे असेल तर फक्‍त एक गोष्ट करा. नेहमी दुसऱ्याला मोठेपणा द्या... माणसाची सर्वात मोठी नि महत्त्वाची गरज कोणती असेल तर आपण कोणीतरी महत्त्वाचे आहोत याला मान्यता मिळणं. कुणीतरी आपलं कौतुक करणं... कौतुकाची अपेक्षा ठेवणं हा माणसांचा नैसर्गिक स्वभाव आहे. 
कौतुकाने प्रेरणा मिळते. कौतुक आपल्या कौशल्यावर शिक्‍कामोर्तब करते. तुम्ही बरोबर आहात हे कौतुकच तुम्हाला सांगते. कौतुकानेच दहा हत्तीचे बळ अंगी येते. कौतुकाने कार्याला गती येते. कौतुकच नवनवी शिखरे गाठण्यासाठी, पुढे झेपावण्यासाठी प्रेरक ठरते. माणूस कौतुकाने मोहरतो... आनंदी होतो. सुखावतो. या सुखासाठीच तो कायम आसूरलेला असतो. असा कौतुक करणारा कुणी भेटला, की तो प्रसन्न होतो. त्याच्यासाठी त्याला अपेक्षित योगदान देण्यासाठी सिद्ध होतो. या साऱ्या मानवी वर्तणुकीचा अभ्यास करूनच हजारो वर्षांपासूनच्या तत्त्ववेत्यांनी एक चिरंजीव निष्कर्ष काढला. यशस्वी ठरायचे असेल तर एक करा, इतरांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते, तसे तुम्ही इतरांशी वागा... 


इतरांनी आपलं कौतुक करावं, असं कार्य आपल्या हातून घडावं नि इतरांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे आपल्याकडून कौतूक घडावं, हा संघटित यशाचा सर्वोत्तम राजमार्ग आहे. जशी आपल्याला इतरांकडून मान्यता हवी असते, आपली योग्यता इतरांना समजावी ही जशी आपली अपेक्षा असते. आपल्या विश्‍वात आपणच केंद्रबिंदू ठरावं ही जशी आपली भावना असते, तसेच आपल्याला खोटी स्तुती अथवा मतलबी कौतुकफुलं नको असतात, तर आपल्या कार्याचे प्रामाणिक कौतुक हवे असेत. नेमक्‍या याच इतरांच्याही इच्छा असतात. बस्स... आपण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहणे म्हणजेच मैत्र जुळवत जाणे... मनं आणि माणसं जिंकत जाणे... इतरांना मोठेपण देणे म्हणजेच आपले मोठेपण वाढवत जाणे..! 


एका कंपनीत नोकरीसाठी अनेकांच्या मुलाखती झाल्या. त्यापैकी नोकरीसाठी एकाचीच निवड झाली. त्या निवड झालेल्या उमेदवाराला इतरांनी त्याच्या या यशाचे रहस्य विचारले. तेव्हा तो म्हणाला, "तुम्ही सारे या नोकरीच्या पदासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे पटवून देण्याच्या नादात स्वत:चेच कौतुक करत राहिलात.' मी मात्र माझ्याबद्दल कमी बोलत मुलाखत घेणाऱ्या मालकांना म्हणालो, "आपण मोठ्या कष्टाने ही कंपनी उभी केलीत. आपल्या कर्तृत्वबळावर ही कंपनी आज मोठ्या शिखरावर आहे. आपली कामावरची निष्ठ, प्रामाणिकपणा अन्‌ अजूनही विलक्षण कष्ट करण्याची आपली तयारी याचेच हे फलित आहे... इथली व्यवस्था, इथलं प्रशासन इथली शिस्त पाहून मी प्रचंड भारावलो. अगदी बारीकसारीक गोष्टीकडेही आपण किती लक्ष दिलं आहे. याचीच पदोपदी जाणीव होत होती. हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटतं, की आपल्यासारखा प्रचंड यशस्वी नि अनुभवसमृद्ध व्यक्‍तीच्या हाताखाली मला काम करता आले तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन...' बस्स माझं हे बोलणं ऐकलं अन्‌ मालक चकीत होत म्हणाले, "अरे... मी एवढं काम केलं; पण माझी अशी कुणी दखल घेतली नव्हती...' 
त्यांनी अमाप कष्टाने हे साम्राज्य उभारले आहे. मी तेच अगदी प्रामाणिकपणे त्यांच्यापुढे व्यक्‍त केलं अन्‌ त्यांना ते भावलं. त्यांनी मला लगेच निवडलं. नोकरीवर घेतलं... 

इतरांचं कौतुक केल्याने आपलं काहीच कमी होत नाही. उलटं आपलं यश वाढतंच... अंत: करणापासून केलेल्या कौतुकामध्ये जबरदस्त ताकद असते. एखाद्या व्यक्‍तीच्या पाठीवर योग्यवेळी कौतुकाची थाप पडली तर त्या एका कौतुकाच्या थापेमध्ये त्याचं आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य असते. प्रत्येकाच्या आत काहीनाकाही सामर्थ्यशाली पण सुप्त असते. कदाचित त्याला ते माहितीही नसते; पण तुमच्या थोड्याशा कौतुकाने ते सामर्थ्य बाहेर येण्याची शक्‍यता प्रचंड बळावते. आपल्यात काहीतरी विशेष आहे. याची त्याला कौतुकानेच जाणीव होते. निखळ कौतुकाची थाप पाठीवर पडणे म्हणजे आपण चांगले आहोत हे सिद्ध होणं. आपल्यातील हे चांगुलपण कळालं, की मग माणूस अधिकधिक चांगले होण्यासाठी धडपडतो. त्या धडपडीतूनच घडतो... 

प्रत्येक माणूस श्रेष्ठच असतो. फक्‍त त्याचे श्रेष्ठपण त्याला जाणवून द्या. तो किती महत्त्वाचा आहे हे त्याचे महत्त्व पटवून द्या. बघा ओसाड वाळवंटात हिरवळ भेटल्याचा आनंद त्याला होईल. तो यशाच्या आभाळात भरारी घेईल. लोकांनी तुमचं ऐकावं वाटतं असेल तर तुम्ही त्याच्याशी तुमच्याबद्दल बोलू नका. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत राहा. कौतुक करणं म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं नव्हे तर सच्चेपणानं त्याला त्याचं महत्त्व पटवून देणे. लक्षात असू द्या... कौतुकातून यश आणि यशातूनच कौतुक जन्म घेतं...  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com