Rajabhau Shirguppe : ज्येष्ठ साहित्यिकाची आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची 'एक्झिट'; विद्रोही चळवळीचा आवाज हरपला!

प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून मंगळवारी कायमची ‘एक्झिट’ घेतली.
Rajabhau Shirguppe Passed Away
Rajabhau Shirguppe Passed Away esakal
Summary

‘न पेटलेले दिवे’ हे त्यांचं पुस्तक विविध थरांतल्या कष्टकरी मुलांबद्दल बोलतं. राजाभाऊंनी या मुलांशी दोस्ती केली आणि त्यांच्या साध्यासोप्या लेखणीने कष्टकरी मुलांच्या व्यथा-वेदना, त्यांचं जगणं सक्षमपणे आपल्यासमोर उभं केलं.

-रवी सरदार

Rajabhau Shirguppe Passed Away : विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नाट्यलेखक व समीक्षक प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांनी आयुष्याच्या रंगमंचावरून मंगळवारी कायमची ‘एक्झिट’ घेतली. त्यांच्याविषयीच्या आठवणींना दिलेला उजाळा...

ग्रामीण आणि दुर्गम भागांतली सहसा माध्यमांपर्यंत न पोहचणारी स्पंदनं टिपण्याचं काम करणारा फिरस्ता लेखक म्हणून राजाभाऊ शिरगुप्पे यांचा उल्लेख करावा लागेल. ‘रिपोर्ताज’ हा फॉर्म त्यांनी समर्थपणे हाताळला आहे. ‘शोधयात्रा - महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागाची’, ‘शोधयात्रा-ईशान्य भारताची’, ‘न पेटलेले दिवे’ ही त्यांची गाजलेली पुस्तके.

Rajabhau Shirguppe Passed Away
आम्हाला कुणबी-मराठा प्रमाणपत्र नको; कोकणातील मराठा समाजानं घेतली वेगळी भूमिका; जरांगेंच्या 'या' निर्णयाला केला विरोध

त्याशिवाय ‘तिच्या नवऱ्याचं वैकुंठगमन,’ ‘कफान’ ही त्यांची गाजलेली नाटकं. ‘प्रॉमिथिअस’ या नावाने ते कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. गाजत असलेल्या रिंगण पथनाट्याचे लेखन राजभाऊंचेच. आजवर विविध प्रकारची बाराहून अधिक प्रकाशित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत; पण त्याखेरीजही साप्ताहिक साधना आणि सत्याग्रही विचारधारा या नियतकालिकांमधून राजाभाऊंनी भरपूर लिखाण केलं आहे. ते ग्रामीण भागातले आणि भाषाही साधी सोपी. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला ग्रामीण वाचकही मिळाला आहे, हे विशेष.

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवाचा ढोल २०१० मध्ये सर्वत्र बडवला जात होता. त्याचवेळी ‘खरा महाराष्ट्र कसा आहे,’ याचा शोध घेत फिरावं, असं राजाभाऊंना वाटलं. आजरा ते नंदूरबारमधल्या श्रीपूरपर्यंतचा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. सरकारचे विकासाचे दावे खरे असतात का, शहरांजवळची गावं विकासाच्या प्रभावाखाली येतात; पण त्यापलीकडच्या गावांचं काय होतं, लोकांना रोजगार मिळतो का, असे नाना प्रश्न डोक्यात घेऊन राजाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला.

लोकांशी संवाद साधला. या प्रवासातून विकसित महाराष्ट्राचं दुसरं भेसूर रूप समोर आलं. त्या प्रवासाची गोष्ट त्यांनी ‘शोध-ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागाचा’ या पुस्तकात लिहिली. महाराष्ट्राला अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव करून देणाऱ्या या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वात महत्त्वाची भर घातली आहे. राजाभाऊंचं दुसरं पुस्तक ईशान्य भारतातल्या समाजजीवनाचा वेध घेतं. तेही त्यांनी ईशान्येतील सर्व राज्यांच्या भटकंती करून, लोकांशी संवाद साधून लिहिलं आहे.

Rajabhau Shirguppe Passed Away
Maratha Reservation : कुणबीच्या 20 हजार नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता; 15 ते 20 लाख लोकांना होणार फायदा

ईशान्येकडच्या राज्यांमधलं जनजीवन, प्रश्न, उर्वरित भारताकडून मिळणारी उपेक्षा आणि तुच्छता, त्यामुळे आलेला न्यूनगंड, प्रादेशिक अस्मिता की रोजीरोटी या द्वंद्वात अडकलेलं तिथलं समाजमन समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या शोधयात्रेत आलेले भलेबुरे अनुभवही त्यांनी या पुस्तकात खेळकरपणे मांडले. ईशान्य भारतातल्या दुर्गम भागांची सामाजिक भटकंती घडवून आणणारं मराठीतलं हे एकमेव पुस्तक असावं.

Rajabhau Shirguppe Passed Away
Raja Shirguppe : ज्‍येष्‍ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं कोल्हापुरात निधन; वयाच्या 64 व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास

‘न पेटलेले दिवे’ हे त्यांचं पुस्तक विविध थरांतल्या कष्टकरी मुलांबद्दल बोलतं. राजाभाऊंनी या मुलांशी दोस्ती केली आणि त्यांच्या साध्यासोप्या लेखणीने कष्टकरी मुलांच्या व्यथा-वेदना, त्यांचं जगणं सक्षमपणे आपल्यासमोर उभं केलं. वर्तमान झाकोळलेलं असलं तरीही उद्याची आशा ठेवत जगणाऱ्या या मुलांचं जग आपल्याला बालपणाचं एक वेगळं रूप दाखवतं.

राजाभाऊंनी विविध नियतकालिकांमध्ये भरपूर लिखाण केलं आहे. त्यापैकी ‘साप्ताहिक साधना’ मध्ये त्यांनी बिहारमधील भटकंतीवर लिहिलेला दीर्घलेख बराच गाजला होता. अलीकडेच राजाभाऊंच्या ‘शोधयात्रा ईशान्य भारताची’ या पुस्तकाचा मराठवाडा विद्यापीठाच्या ‘बी.ए. दोन’ च्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. राष्ट्र सेवा दलाची पार्श्वभूमी असणारे राजाभाऊ इंग्रजीचे प्राध्यापक होते; पण समाज समजून घेऊन त्यातलं वास्तव लोकांसमोर आणण्याची आस त्यांना शांत बसू देत नव्हती.

Rajabhau Shirguppe Passed Away
Belgaum Black Day : कोगनोळी टोल नाक्याजवळ विजय देवणेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना रोखले; कर्नाटक पोलिस-नेत्यांमध्ये बाचाबाची

त्यामुळे लवकरच त्यांनी प्राध्यापकी सोडली आणि ते कार्यकर्ता-पत्रकाराच्या भूमिकेत शिरले. देवदासी चळवळ, तंबाखू आंदोलन, विडी कामगारांचं आंदोलन, शेतकरी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक संस्था, संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. डाव्या विचारसरणीच्या विविध घटकांशी त्यांचा निकटचा व मार्गदर्शक म्हणून संबंध होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com