गोफण | अण्णा गळकेंनी खरंच धमकी दिली का?

gofan Article
gofan Articleesakal

कडक इस्रीचा खादी कुर्ता.. तसाच नॅरो पायजमा, शानदारपणे दुमडलेल्या बाह्या, कोरलेली दाढी अन् भाळावर तलवारीसारखा टोकदार उभट टिळा... हे देखणं रुप होतं मावळाच्या अण्णा गळके यांचं. मागे वतनदारीचं वाटप झाली त्यावेळी त्यांच्या परस्पर दादाराव दणगटेंनी त्यांना वतनदारी बहाल केली होती. त्या निष्ठेपोटी अण्णांनी तहाच्या काळात दादारावांच्या गटासोबत राहाणं पसंत केलं होतं.

सध्या अण्णा गळकेंची अवस्था विचित्र झाली होती. जे काही घडलं होतं त्यामुळे ते आतून तर खूश होते. पण दादारावांचं फर्मान होतं की, चार माणसात गेल्यानंतर चेहऱ्यावर नाराजी, संताप दिसला पाहिजे.. एवढंच नाही तर उद्विग्नता, हतबलता... हे सगळे भाव एकवटून मिळेल तेवढी सहानुभूती गोळा करा.

त्यामुळे अण्णा गळके घरात एक अन् बाहेर दुसरेच असायचे. घरात असतील तेव्हा-

''समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबरSS..S

अन् गळकेअण्णा आहे एक नंबर''

या गाण्यावर ठेका धरायचे. आजही याच गाण्यावर त्यांनी ठेका धरला होता.

लोकप्रिय नेता जनतेचा मेंबरS.SS..

अन् गळकेअण्णा आहे एक नंबर

एक-एक पायरी चढे झरझर..SS

अन् गळकेअण्णा आहे एक नंबर

तेवढ्यात दारात सायरन वाजवीत गाड्यांचा ताफा थांबला. झपाझप् पावलं टाकीत दस्तुरखुद्द महामहिम दादाराव दणगटे येत होते. तसे अण्णा गळके धावत दारात गेले अन् कमरेत वाकून दादारावांचं स्वागत केलं. ''काय रे अण्णा काय चाललंय हे.. घरात नाचतोस वाटतं?''

तसे अण्णा गळके शरमले. ''तसं न्हाई दादा. पर मोठे सायेब माझ्याबद्दल बोलले. ह्या एवढ्या साध्या माणसाचा त्यांनी उद्धार केला बगा. मनाला लै लै शांती वाटली.''

''तुझी हिकडं शांती व्हईल पण ते तिकडं क्रांती करतेल.. तुला पत्ताबी लागणार नाय.. म्हणून सांगतोय भानावर ऱ्हा, डोळे उघडे ठेवून कामं करा.'' दादारावांनी आल्याआल्या दम द्यायला सुरुवात केली होती.

गळके अण्णांनी एक निरागस प्रश्न उपस्थित केला, ''पण दादा.. मी तर कुणालाच धमकी दिली नव्हती.. तरी मोठे साहेब असं का बोलले?''

दादारावांनी शून्याकडे नजर टाकली आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते आठराशे सत्तावन्नच्या पूर्वीचं काहीतरी सांगतील असं वाटत होतं. गळके अण्णाही तसेच गंभीर झाले.. त्यांनीही दादावांनी ज्या दिशेला बघितलंय त्याच दिशेला शून्यात नजर टाकली अन् ऐकायला लागले. दादाराव एवढंच बोलले- ''तुला न्हाई कळायचं ते!'' एका वाक्यावर बोळवण झाल्याने गळके अण्णांचा हिरमूड झाला.

पण अण्णांमध्ये जोश जागा झाला होता.. त्याच आवेशात त्यांनी त्यांच्या आवडीचं गाणं गायला सुरु केलं-

मावळ आम्ही वादळ आम्ही

आरं मरणाचाबी काळ आम्ही..

रण मस्तांची जात आमची

आरं भ्या कुणाला दावतो रंSS...

''गप बाळा. नको त्रास करुन घेऊ.'' दादारावांनी गळणे अण्णांचा गळा बंद केला.

''मग आता पुढं काय करायचं दादा? त्यांनी तर मला धमकी दिलीए, बघून घेतो म्हणून.. आता?'' गळके अण्णांच्या चेहऱ्यावर नाही म्हटलं तरी भीती होतीच.

खरंतर दादारावांनाही यामागचा डाव कळलेला नव्हता.. पण काकासाहेबांचे गेम आपल्याला माहिती असतात, असं दाखवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असे.

''कसंय अण्णा, आपुनच त्यांना चॅलेंज देऊ.. ज्याला धमकी दिली त्यो माणूस उभा करा.. नायतर तुमच्या नावानं बोंबा ठोकील म्हणायचं. जा गावात सांग सगळ्यांना..''

शहाण्या मुलासारखं गळके अण्णा गावच्या दिशेने बोंबा ठोकीत पळत सुटले होते.. दादाराव निघून गेले. कानमंत्र दिला खरा पण तो मंत्र काम करील का नाही, याबाबत त्यांना शंका होती.. काकांचा नेमका गेम काय? यावर विचार करुन करुन पुन्हा आजारी पडण्याची वेळ दादारावांवर आली होती. नाहीतरी बरेच दिवस झाले ते आजारीही पडलेले नव्हते..

समाप्त!

संतोष कानडे

(santosh.kanade@esakal.com)

gofan Article
गोफण | बारामतीकर काकांचं निमंत्रण अन् पाहुणे भुकेने व्याकूळ
gofan Article
गोफण | दादारावांचा आदर्शवादी अशोकचंदांना सल्ला
gofan Article
गोफण | गावात कुणी विरोधक आहे का याचा शोध घ्या!
gofan Article
गोफण | निमंत्रण मिळालं अन् ते खुश झाले...
gofan Article
गोफण | नमोशेठ हिंदुळेंना जेव्हा रडण्याची संधी मिळाली...
gofan Article
गोफण | ती म्हैस सुरतवरुन गुवाहाटीला कशी गेली?
gofan Article
गोफण | दादांचं उलट टपाली उत्तर! म्हणाले, देवाभाऊ...
gofan Article
गोफण | ती म्हैस सुरतवरुन गुवाहाटीला कशी गेली?
gofan Article
गोफण | 'प' से पनौती नहीं... पर्णकुटी!
gofan Article
गोफण| सत्तेतही तुम्हीच अन् कुलूप ठोकणारेही तुम्हीच...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com