esakal | सगळं काही असूनही पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का ?

बोलून बातमी शोधा

pune  corona

पीएमओ ते सीमओ कार्यालयापासून सगळ्यांचे लक्ष पुण्याकडे आहे, कारण देशात सर्वाधिक वेगाने रुग्णसंख्या वाढत असलेल्या शहरांत पुण्याचाही समावेश आहे. या शहराला नेतृत्त्वाची वानवा नाही अन साधनसामग्रीचीही ! तरीही पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का निघत आहेत ?

सगळं काही असूनही पुण्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे का ?
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

हेही वाचा: पुण्यातील ऑक्सिजनच्या यंत्रणेची पाहणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन बेडचा तुटवडा वाढतच आहे, व्हेंटिलटेरचा बेड मिळाला तर, नशिब, रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी लोकांची धावाधाव सुरूच आहे... एखादा रुग्ण आजारी पडला तर, कोरोनामुळे नाही तर धसक्यानेच त्याचा जीव जाण्यासारखी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.

म्हटलं तर, पुणे हे देशभर लौकीक मिळालेलं शहर. आरोग्यदायी वातावरणासाठी, मेडिकल टुरीझमसाठी प्रख्यात. सगळ्या पायाभूत सुविधा इथं हात जोडून उपलब्ध आहेत. शिक्षण संस्था, उद्योग- व्यवसाय, आयटीचं शहर अशी बहुआयामी ओळख या शहराला आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्येही हे सधन शहर. त्यातच लाईफ स्टाईलही या शहरातील चांगल्या दर्जाची आहे. राहण्यास योग्य शहर (मोस्ट लिव्हेबल शहर) असा किताब एकदा नव्हे तर, दोन-चारदा तर या शहराला नक्कीच मिळाला आहे. म्हटलं तर सगळं काही या शहरात आहे. तरीही आज हे शहर भयप्रद वाटू लागले आहे. फेसबुक उघडलं तर, श्रध्दांजलीच्या पोस्टच दिसू लागल्या आहेत.

हेही वाचा: व्यावसायिक वीजग्राहकांच्या वीजदरात महावितरणकडून वाढ

नेतृत्त्व म्हणाल तर, इथं त्याची वानवा नाही. राज्याचे नेते शरद पवार यांची पुणे ही देखील एक ओळख आहे अन पुण्यात त्यांचे नेटवर्किंगही आहे. पालकमंत्री, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पुण्यातीलच आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याही इथल्याच. केंद्रीय मंत्री प्रकास जावडेकर हेही पुणेकरच. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुक्काम सध्या पुण्यातच असतो. पमतदार यादीनुसार तरी ते सध्या पुणेकरच आहेत. पुण्याच्या राजकारणात आणि समाज जीवनात गेली 50 वर्षे समरस झालेले कासदार गिरीश बापटही अस्सल पुणेकरच. म्हणजेच देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर पुण्याचा प्रभाव असूनही आज तो अस्तित्वहिन झाला आहे.

राज्यभर ओळख असलेले इतके नेते पुण्यात असूनही सध्या हे शहर प्रशासनाच्या भूमिकेवर सुरू आहे. अर्थात प्रशासन हाच राज्यकारभार चालविण्याचा कणा असतो, यात शंक नाही. पण, खमका नेता असल्यावर यंत्रणा आणखी सुरळीत धावते, असा आजवरचा अनुभव आहे. शिवाय एरवी माध्यमांत वारंवार चमकत राहणारे स्थानिक स्तरावरच्या नेत्यांचीही संख्या मोठी आहे. पण या आपत्तीच्या परिस्थितीत शहरावर कंट्रोल कोणाचा तर, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा ! उलट परिस्थिती नागपूरमध्ये आहे. त्या ठिकाणीही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेथे ठाण मांडले अन यंत्रणा गदागदा हलविली. स्वतः लक्ष घातले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरबद्दल असलेली आत्मियता कामातून दाखवून दिली. मग प्रश्न पडतो, की पुण्यात असे कधी होणार ?

हेही वाचा: गावासाठी उभारला वॉटर फिल्टर प्रकल्प

पुण्यात उद्योग- व्यवसाय, लघुउद्योग यांचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आहे. वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सोबतीला मराठा चेंबर ऑफ इंड्स्ट्रीज अॅंड अॅग्रीकल्चर, भारतीय जैन संघटना, जितो, शेकडो रोटरी आणि लायन्स क्लब आहेत. आणखीही अनेक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि त्यात सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेले भरपूर कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवाराचाही सेटअप मोठा आहे. हे सगळे आपआपल्या पद्धतीने कार्यरत आहेत. अगदी सरकारचे उदाहरण घेतले तर, पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालय यांचेही पुण्यावर, येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. कोरोनाचे संकट देशात सगळीकडेच असले तरी, पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, यावर केंद्र आणि राज्य सरकारचे एकमत आहे. सोशल मीडियावरही पुणे इज द कॅपिटल ऑफ कोरोना, अशा आशयाच्या मिम्स फिरत आहेत, त्यात अतिशयोक्ती असली तरी, पुण्यातील ढासळलेल्या आरोग्य परिस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यावर बारकाईने लक्ष आहे, उद्योग- व्यवसायांना हाक मारली तर, प्रतिसाद देण्याची त्यांची वृत्ती आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, शिक्षण संस्थाही यातून मागे हटणार नाही आणि मुख्य म्हणजे पुणेकर सजग आहेत. साधन सामग्रीची वानवा नसलेल्या या शहरात सगळ्यांची मोट एका मोळीत बांधता का येत नाही ?, प्रशासनाला मर्यादा असल्या म्हणून काय झालं, ही जबाबदारी कोण उचलणार ? का पुणेकरांनी तडफडत मरायचं ? एरवी पुण्यावर हक्क सांगणारे आणि पुण्याची ओळख जगभर दाखविणारे आपले लोकप्रतिनिधींचे अस्तित्त्व या परिस्थितीत का जाणवत नाही ? महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या डोक्यात अजूनही पुढच्या निवडणुकीची गणितं आहेत, असे वाटते. एकंदरीतच युद्धपातळीवर पुण्यासाठी कोणी पावले उचलली तर हे शहर पुन्हा बाळसं धरेल नाही तर, वुहान होईल, अशी भीती वाटू लागली आहे.