coronavirus - स्वीडनमध्ये कारखानदारी सुरू, सरकारचे नियोजनबद्ध पाऊल 

योगेश सारंगधर, औरंगाबाद 
Tuesday, 14 April 2020

स्वीडन देशाने लॉकडाऊन केलेले नाही. कर्मचाऱ्यांचे गट पाडून कंपन्यांमध्ये काम सुरू आहे. एक कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येच्या या देशात साडेदहा हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मात्र, फारसा धसका न घेता सरकार नियोजनबद्ध पावले उचलतेय.

मूळ औरंगाबादचे किशोर सुरेश देशपांडे हे २०१३ पासून स्वीडनमध्ये राहतात. त्यांनी एमआयटीमधून संगणक विज्ञान व अभियांत्रिकीत बी.टेक. केले. श्री. देशपांडे यांनी स्टॉकहोममध्ये आयटी सल्ला सेवा प्रदान करणारी स्वतःची कंपनी सुरू केलीय. यासंदर्भात ‘सकाळ’ने त्यांच्याशी साधलेला संवाद... 

प्रश्न : स्वीडनमध्ये लॉकडाऊन नाही. सरकार कसे नियंत्रित करतेय? 
किशोर देशपांडे :
देश लॉकडाऊन करण्याऐवजी स्वीडनने सोशल डिस्टन्सिंगवर भर दिलाय. याशिवाय सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. देशात विषाणूचा प्रसार मर्यादित ठेवणे, वैद्यकीय सेवा निश्चित करणे, अन्य देशांमधून स्वीडनच्या प्रवासावर तात्पुरती बंदी असे उपाय केले आहेत. इतर देशांच्या तुलनेत स्वीडनची लोकसंख्या घनता कमी आहे. सध्या इथे पन्नासहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. नागरिकही जबाबदारीने वागताहेत. त्यामुळे आता दररोजचे कोविड-१९ चे नवीन रुग्ण हळूहळू कमी होताहेत. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

प्रश्न : सध्या कारखानदारीचे कसे चाललेय? 
किशोर देशपांडे :
सरकारने कर्मचाऱ्यांना मर्यादित प्रवास व संसर्गाचा धोका असल्यास घरून काम करू देण्याचा सल्ला कंपन्यांना दिलाय. घराबाहेर पडून काम करण्याशिवाय पर्याय नसणाऱ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे गट केले आहेत. आठवड्यातून एका गटात कर्मचारी काम करताहेत. यामुळे सर्व कर्मचारी एकाच वेळी संक्रमित होण्याचा धोकाही कमी झालाय. कंपन्या आवश्यक वस्तूंचे उत्पादन घेताहेत; पण नवीन व्यवहार थांबलेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने छोट्या आणि बाधित व्यवसायांना पॅकेज जाहीर केले आहे. 

प्रश्न : आरोग्य सेवा कशी आहे व बदल होतील? 
किशोर देशपांडे :
स्वीडनमध्ये खूप चांगली आरोग्य सेवा आहे. एका वर्षात एका व्यक्तीस रुग्णालयात १२०० SEK (८५०० रुपये) यापेक्षा जास्त खर्च करावा लागत नाही. इथे उर्वरित उपचार निःशुल्क आहेत. भविष्यात वैद्यकीय सुविधा अधिक सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रवासादरम्यान स्वच्छता, वैद्यकीय तपासणीचे निकष बदलू शकतात. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

प्रश्न : स्वीडनमधील लोक चीनकडे कसे पाहतात? 
किशोर देशपांडे :
स्वीडिश लोक इतर देशांवर किंवा लोकांवर दोषारोप देण्यावर विश्वास ठेवत नाहीत. इतर साथीच्या आजारांप्रमाणे कोविडसाठी उपाययोजना केल्या जाताहेत. कोणालाही दोष देण्याऐवजी समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकार व देशवासीय करीत आहेत. 

प्रश्न : भारताने लॉकडाऊन वाढविलाय. काय वाटते? 
किशोर देशपांडे :
भारतात १३० कोटी लोकसंख्येमुळे लॉकडाऊन आवश्यक होते. जास्त लोकसंख्या आणि घनता असूनही कोरोनाचा प्रसार रोखून ठेवल्याबद्दल भारताचे जगभरात कौतुक होत आहे. पण कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी नक्की लागेल. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Starting a factory in Sweden, Planned action of the government