गर्दी कमी करा, अन्यथा....; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

uddhav-thackeray
uddhav-thackeray

मुंबई -  जीवनावश्यक वस्तुंची, औषधांची कमी नाही, त्यांची दुकाने बंद नाहीत तरी विनाकारण काही लोक बाहेर पडताहेत, पोलीसांशी हुज्जत घालत आहेत, कृपया असे करू नका, घराबाहेर पडू नका असे कळकळीचे आवाहन करतांना उद्धव ठाकरे यांनी अजून ही गर्दी थांबवा, आणखी कठोर पाऊले टाकायला भाग पाडू नका असे म्हटले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते सर्वांचे सहकार्य आजपर्यंत राज्यातील सर्व जनतेने संयमाचे अतुलनीय दर्शन घडवले आहे ते पुढेही काही दिवस कायम ठेवा, घरात राहा, विरंगुळ्याचे, कुटुंबियांसमवेतचे क्षण अनुभवा असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याला केंद्र सरकारचे पूर्ण सहकार्य आहे. पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर , विरोधीपक्ष नेते, मंत्रीमंडळातील सहकारी, राज ठाकरे माझ्याशी चर्चा करत आहेत, सर्वजण या प्रश्नावर एकत्र येऊन काम करत आहेत. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो असेही ते म्हणाले.

मदतीचे अनेक हात
काल मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड 19 या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. उदय कोटक यांनी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. कंपन्या, उद्योजक पुढे येत आहेत, कुणी रुग्णालय सेटप उभे करत आहे तर कुणी मास्क पुरवित आहे. एक चांगली टीम या निमित्ताने तयार झाली आहे, काम करत आहे.

जिथे आहात तिथेच थांबा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची
इतर राज्यातून आलेले लोक, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. त्यांना विनंती आहे की, त्यांनी आहेत तिथेच थांबावे,  महाराष्ट्र शासनाने त्यांची सम्पूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी 163केंद्रे सुरु झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय  केली आहे.

तर सीएमओशी संपर्क करावा
तसेच महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यात अडकले असतील त्यांनी तिथेच राहावे, अडचण आल्यास मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क करावा, त्यांना संबधीत  राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मदत उपलब्ध करून दिली जाईल.

जीवनावश्यक वस्तु आणि सेवा सुरु
कामगारांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली पाहिजे हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी जीवनावश्यक वस्तु, औषध दुकाने आणि सेवा बंद केल्या नसल्याचा पुनरुच्चार केला. यासाठी होणारी गर्दी कमी करावी, यंत्रणेवरचा ताण वाढवू नये असे आवाहन ही केले.

पाच रुपयात शिवभोजन
ही आरोग्याशी संबंधित लढाई असल्याचे सांगून एकत्रित प्रयत्नातून आपल्याला ती जिंकायची आहे, त्यासाठी जबाबदारीने वागायचे आहे.  राज्यात शिवभोजन केंद्रात कार्ड असो वा नसो आता पाच रुपयात लोकांना पुढची तीन महिने जेवण देण्यात येणार असल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली.

डॉक्टरांनीच माझे मनोधैर्य वाढवले 
कस्तूरबा आणि नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझेच मनोधैर्य वाढले इतक्या सुंदर प्रकारे आपले हे आरोग्य सेवेतील लोक काम करत आहेत. त्यांच्या मनात कुठलीही भीती नाही, हे डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जीवनावश्यक सेवा देणारे सर्व लोक हे खरे शुरवीर आहेत, मला त्यांचा अभिमान वाटतो, जीवावर उदार होऊन ते काम करत आहेत हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे असे श्री. ठाकरे म्हणाले.

राज्यात चाचणी केंद्रे वाढली 
राज्यात चाचणी केंद्रे वाढवली आहेत, त्यामुळे कोरोना पॉझेटिव्हची संख्या वाढेल ही अपेक्षा आहेच परंतू अपेक्षेपलिकडे ही संख्या जाता कामा नये, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, बरेच रुग्ण बरे होऊन घरी परत जात आहेत ही समाधानाची बाब आहे. खाजगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद न करता त्यांच्याकडे येणाऱ्या या  तसेच न्यूमोनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात पाठवावे कारण लक्षणाची तीव्रता कमी असतांनाच आपण त्यावर विजय मिळवू शकतो. 

होम क्वारंटाईन लोकांनी घराबाहेर पडू नये
होम क्वारंटाईन लोकांनी कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी स्वत:ला घरातच ठेवावे असे सांगतांना घरातील 60 वर्षावरील वयस्क माणसे, गरोदर स्त्रिया, मधुमेह, उच्चरक्तदाब असलेले माणसे यांना जपावे असे ही मुख्यमंत्री म्हणाले

विषाणुचा गुणाकार होऊ न देता वजाबाकी करायची आहे

विषाणुचा गुणाकार न होऊ देता त्याची वजाबाकी करावयाची असल्याने हा टप्पा सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रविवार असला तरी घरीच बसावे विषाणुला हरवण्यासाठी संयम, जिद्द कायम ठेवावी, आपण  हे युद्ध नक्की जिंकू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-

* विरोधी पक्षनेत्यांनी साथ मिळते आहे.
* ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची परिस्थिती बघवत नाही.
* राज ठाकरे यांच्याकडून काही सूचना आल्यात.
* मी पंतप्रधानांशी बोलतोय, गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलतोय. विरोधी पक्षांचे नेते हे देखील आमच्याबरोबर आहेत या प्रसंगात
* संपूर्ण देशात इतर राज्यातील कामगार आपापल्या राज्यात जायला उत्सुक आहेत त्यांना एक सांगावं वाटते की त्यांनी आहे तिथे थांबावं
* 163 ठिकाणी यांच्यासाठी केंद्रे सुरू केली आहेत अजून काही सुरू होतील
* जिथे आहात तिथे थांबा.
* कुठेही मदत पाहिजे असेल तर सीएम ऑफिसला सांगा आम्ही मदत करू
* साखर कारखान्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांची, ऊस तोड कामगारांची काळजी घ्या
* सोयी सुविधांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने 24 तास चालू असले तरी लोक दुर्लक्ष करत आहेत. 
* पोलीस यंत्रणेला सहकार्य करा. बाहेर पडू नका
* संयम ठेवा, कुठेही वर्दळ होऊ नका.
* सरकारला कठोर पाऊल उचलायला लावू नका.
* मी विनंतीच करतोय अजून.
* काही ठिकाणी मोफत जेवण सुरू केलय
* शिवभोजन पूढील 3 महिने 5 रुपयात आहे

* गेले काही दिवस कस्तुरबा आणि नायडू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसोबत बोललो ते गोंधळलेले नाहीत. त्यांच्याशी बोलल्यावर आपलेच मनोधैर्य  वाढवतात ते.
* डॉक्टर- कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा. त्यांचा अभिमान वाटतोय
* ही मंडळी 24 तास हा धोका पत्करतात. आता तुम्ही त्यांचं काम वाढवू नका त्यांना सहकार्य करा.
* कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे अपेक्षेप्रमाणे वाढत राहील.
* खाजगी डॉक्टरांना सूचना. सर्दी खोकला ताप न्यूमोनिया असेल तर एक्स रे करायला लावा. जर संशय आला तर कोरोना साठी असलेल्या यंत्रणेकडे पाठवा.
* पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची लक्षणे प्राथमिक स्तरावर आहेत त्यावरच त्यावर इलाज करणे महत्वाचे आहे
* जर कोणी बाहेरगावी जाऊन आलेले असाल तर त्यांनी स्वतःहून विलगीकरण व्हावे.
* हायरिस्क गृप कडे काळजीने बघावे लागेल. यात मधुमेह,रक्तदाब, गरोदर माता, लहान बाळ हे येतात, या लोकांना जपावे लागेल.
* गुणकाराचा काळ हाच आहे याचं काळात आपण या रोगाची वजाबाकी करूया. यात आपण नक्की जिंकू फक्त संयम ठेवा 
* जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, हे पुन्हा सांगतो 
* तुम्ही फक्त घरात रहा, घराबाहेर तुमचं सरकार खंबीर आहे.
* कुटुंबियांसोबत वेळ घालवा. गाण्यांच्या भेंड्या खेळा, कॅरम खेळा. आनंदी रहा
* जिद्द ठेवा, आपण नक्की जिंकू, हे ही दिवस जातील. 
* याची नोंद जगाच्या इतिहासात होणार आहे. ही लढाई आपण जिंकू हा आत्मविश्वास माझ्यात आहे तुमच्यात रहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com