Coronavirus : महानायकाच्या हातावर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का

amitabh-bachchan
amitabh-bachchan

मुंबई - भारतात कोरोना व्हायरसचा धोका वाढत असून शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच घरात एकांतवासात राहत असल्याचा शिक्का हातावर उमटविल्याचे छायाचित्रही त्यांनी पोस्ट केले आहे. 

अमिताभ यांनी हातावर ‘होम क्वारंटाइन’ असा शिक्का मारल्याचे स्वतःचे छायाचित्र मंगळवारी (ता. १७) रात्री उशिरा ट्विटरवर पोस्ट केले आहे. ‘टी ३४७३- मुंबईत मतदानाच्या शाईने हातावर शिक्के मारण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षा बाळगा, काळजी घ्या आणि जर संसर्ग झाला असेल तर वेगळे राहा,’ असा संदेशही त्यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसवर सोशल मीडियावर जनजागृती करण्यात अमिताभ सक्रिय आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतीच कविता लिहिली होती. त्याचा व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर प्रसारित केला होता.

पाकिस्तान बंद ठेवता येणार नाही - इम्रान
इस्लामाबाद - कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे पाकिस्तान शहरांना बंद ठेवू शकत नाही, अशी कबुली आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. जगभरात १३५ हून अधिक देशांत कोरोनाचा फैलाव झाला असून अमेरिकेसह अनेक देशांनी रेस्टॉरंट, व्यावसायिक केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अर्थव्यवस्था पाहता सर्व व्यवहार बंद ठेवणे शक्य नाही, असे पंतप्रधानांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून बोलताना इम्रान खान म्हणाले, की कराची हे देशाचे मोठे आर्थिक केंद्र असून तेथे लोकसंख्या अधिक आहे. तेथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचा विचार केला होता, मात्र हा लॉकडाऊनचा निर्णय हा देशाची अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त करणारा ठरू शकतो, या भीतीने ते मागे हटले,

इराणमध्ये १०३ वर्षांची वृद्ध महिला ठणठणीत
तेहरान -
 कोरोना विषाणूच्या संसर्गाचा मोठा फटका वृद्धांना बसतो असून या संसर्गामुळे मरण पावणाऱ्या वृद्धांची संख्याही मोठी आहे. इराणमध्ये मात्र एक वेगळे आणि आशादायी उदाहरण समोर आले आहे. येथील संसर्ग झालेल्या १०३ वर्षांच्या वृद्धेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन ती पूर्णपणे बरी झाल्याचे उघड झाले आहे. या वृद्धेचे नाव तेथील माध्यमांनी अद्याप जाहीर केलेले नाही. कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना आहे कारण त्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी असते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणमध्ये आज दिवसभरात १४७ जणांचा मृत्यू झाल्याने येथील मृतांची संख्या १ हजार १३५ वर गेली आहे. तेहरान प्रांतामध्ये सर्वाधिक म्हणजे नव्याने २१३ जणांना विषाणूंचा संसर्ग झाला असून, इसफाहान प्रांतात हे प्रमाण १६२ वर पोचले आहे.

शहरांत पूर्णपणे टाळेबंदी करा
नवी दिल्ली -
 विषाणूच्या संसर्गाचा मोठा आर्थिक फटका उद्योगांना बसू लागला असून, भविष्यातील याची तीव्रता रोखायची असेल; तर या आठवड्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये पूर्णपणे टाळेबंदी करण्यात यावी, अशी मागणी उद्योजक आणि स्टार्टअप कंपन्यांच्या समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हा विषाणू राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर भेदभाव करत नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच ठोस आणि आक्रमक कारवाई करणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये २० मार्चपासून दोन आठवड्यांसाठी पूर्णपणे टाळेबंदी केली जावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. अर्बन कंपनीचे सहसंस्थापक अभिराजसिंह भाल यांनी आत्ताच उपाययोजना केल्या, तर भविष्यातील पाचपटीने अधिक मृत्यू रोखता येऊ शकतात, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com