Ashadhi Ekadashi 2022: विठोबाला कानडा का म्हटलं जातं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi 2022

Ashadhi Ekadashi 2022: विठोबाला कानडा का म्हटलं जातं?

महाराष्ट्रातील भागवत धर्माचा संप्रदाय म्हणून ख्यातकीर्त असलेल्या वारकरी संप्रदायाचे उपात्य दैवत विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठोबाचे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे वारकऱ्यांचे ते प्रमुख तीर्थस्थान आहे. पण तुम्हाला या पांडूरंगाचं कर्नाटकशी असलेलं नातं माहिती आहे का? विठोबाला कानडा का म्हटलं जातं? (Ashadhi Ekadashi)

वारकऱ्यांचे उपात्य दैवत असलेले विठोबा आंध्र-कर्नाटकातील कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत आहे. आषाढी आणि कार्तिकी शुद्ध एकादशांना तेथे सर्व वारकरी, तसेच महाराष्ट्र-आंध्र-कर्नाटकांतून लाखो अन्य भाविक विठोबाच्या दर्शनासाठी येत असतात. (do you know relation between lord vithhal and karnataka)

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2022 प्रतिपंढरी जमला वैष्णवांचा मेळा; विठ्ठलवाड़ीत दुमदुमणार हरी नामाचा गजर

पंढरपूर येथील विठोबाच्या मंदिरातल्या सोळंखांबी मंडपातील एका तुळईवर कोरलेल्या संस्कृत आणि कन्नड लेखातील संस्कृत आणि कन्नड अशा दोन्ही भागांत पंढरपूरचा निर्देश ‘पंडरगे’असा केलेला आढळतो. पंडरगे हेच पंढरपूरचे मूळ नाव असून ते कानडी आहे.

या नावावरूनच पांडुरंगक्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरीकक्षेत्र, पांडरीपूर, पांडरी व पंढरपूर ही क्षेत्रनामे तयार झाली. विठोबाला पांडुरंगही म्हणतात पण ‘पांडुरंग’ हे नाव पंडरगे ह्या मूळ क्षेत्रनामाचेच संस्कृतीकरण असून क्षेत्रनाम म्हणूनही ते वापरले जात होते.

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2022 विठू माऊली तू माऊली जगाची...

‘पांडुरंग’ ह्या शब्दाचा अर्थ ‘शुभ्र रंग’ असा होत असल्यामुळे तो गौरवर्णीय शिवाचा दर्शक आहे. तरी तसा अर्थ मराठी संतांना अभिप्रेत असल्याचे कुठेच दिसून येत नाही. मराठी संत हे शिव आणि विष्णू ह्यांच्या ऐक्याचेच पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला विष्णुचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानले. त्यांच्या दृष्टीने तो गोपवेष धारण केलेला श्रीहरी आहे. गाईच्या खुरांमुळे उधळलेली धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धूसर झालेल्या गोपाळकृष्णाला त्यांनी ‘पांडुरंग’ म्हटले आहे.

श्रीज्ञानदेवांपासून निळोबांपर्यंत अनेक मराठी संतांनी विठोबाचे गुणगान केले आहे त्याचप्रमाणे चौंडरस, कनकदास, पुरंदरदास अशा दक्षिण भारतीय कवींनीही विठोबाला आपले परमप्रिय आराध्य दैवत मानले आहे. सुप्रसिद्ध माध्वपंडित वादिराजतीर्थ ह्यांनीही आपल्या काव्यात विठोबांची स्तुती केली आहे.

हेही वाचा: Ashadhi Ekadashi 2022 : वेलू गेला गगनावरी

विठ्ठलापासून विठोबा हे नाव प्रचारात आले. विठ्ठल ह्या नावाची सर्वमान्य अशी उत्त्पती मिळालेली नाही. इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी विठ्ठल हा शब्द ‘विष्ठल’ (दूर रानावनात असलेली जागा) ह्या शब्दापासून आल्याचा दावा केलाय. यानुसार विठ्ठलदेव हा दूर, रानावनात असणारा देव ठरतो. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या मते ‘विष्णु’ ह्या शब्दाचे कानडी अर्श ‘विट्टि’ असे होते. आणि ‘विट्टि’ वरूनच ‘विठ्ठल’ हे रूप तयार झाले.

शब्दमणिदर्पणाच्या एका प्रकरणातील ३२ व्या सूत्राचा आधार घेऊन राजपुरोहित ह्यांनी विष्णुचे ‘विट्टु’ असे रूप कसे होते, हे दाखवले आहे. ह्या रूपालाच प्रेमाने ‘ल’ हा प्रत्यय लावला, की ‘विठ्ठल’ असे रूप तयार होते, इटु, इठु, इटुबा, इठुबा ही विठ्ठलाची ग्रामीण मराठीतील नामोच्चारणे आहेत आणि विठ्ठलाचे ध्यान कमरेवर हात ठेवलेले, असे आहे.

श्रीविठ्ठलाचे एक अभ्यासक विश्वनाथ खैरे ह्यांनी ‘इटु’ असा शब्द तमिळ भाषेत असून त्याचा अर्थ ‘कमरेवर हात ठेवलेला’असा असल्याचे सांगितले ‘विटेवर जो उभा, तो विठ्ठल’अशीही एक व्युत्पत्ती दिली जाते. विठ्ठल हा ‘युगे अठ्ठावीस’ पंढरपुरी विटेवर उभा आहे, असे म्हटले जाते. त्याचा अर्थ, चालू अठ्ठावीसाव्या युगातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे, असे घेतात.

हेही वाचा: Ashadhi Ekadashi : बीडचे नवले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

विठ्ठल हा कानडा आहे. श्रीज्ञानदेवांनी त्याला ‘कानडा’ आणि ‘कर्नाटकु’ अशी दोन्ही विशेषणे लावलेली आहेत. एकनाथांनी ‘तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये।’असे म्हटले आहे, तर नामदेवांनी ‘कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी’ असा त्याचा निर्देश केला आहे.

नामदेव तर विठ्ठलाचा भाषिक निर्देशही करतात ‘कानडा म्हणजे अगम्य’ अशा अर्थानेही संतांनी श्रीविठ्ठलाचे उल्लेख केलेले आहेत. ‘कर्नाटकु’ या शब्दाचा कर्नाटक या प्रदेशाशी संबंध नसून ‘कर्नाटकु’ म्हणजे ‘करनाटकु’ वा ‘लीलालाधव दाखविणारा’, असेही मत काही अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे परंतु पंढरपूर हे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर आहे.

त्याचे प्राचीन नाव ‘पंडरगे’ हे तर कानडीच आहे. विठ्ठलाचे बहुतेक सेवेकरीही कर्नाटकातले आहेत, या बाबीही लक्षणीय ठरतात. श्रीविठ्ठल हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या, तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

Web Title: Ashadhi Ekadashi Do You Know Relation Between Lord Vithhal And Karnataka And Why Vithoba Called Kanadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top