"स्वराज्य ते गणराज्य रॅली'त संविधानवाद्यांचा एल्गार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

असंवैधानिक कायदे बहुमताच्या आधारे संसदेत मंजूर करून राज्यघटनेची पायमल्ली करत मनमानी कारभार करणाऱ्या भाजप सरकारला "स्वराज्य ते गणराज्य' ही मशाल रॅली चपराक असेल. याची मुहूर्तमेढ सोलापुरात आज रोवली आहे. हे विधेयक जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे रॅली काढण्यात येतील.

सोलापूर : "आझादी-आझादी', "जंगल से विश्‍व विद्यालय तक हमारी लढाई जारी है', "इन्कलाब झिंदाबाद', "भारत माता की जय', अशा घोषणा देत येथील संविधानवाद्यांतर्फे शनिवारी (ता. 21) सायंकाळी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात "स्वराज्य ते गणराज्य' या संकल्पनेनुसार मशाल रॅली काढण्यात आली.

हेही वाचा : धक्कादायक... "या' शहरातील कोचिंग क्‍लासेसमधील विद्यार्थी असुरक्षित!

फलक उंचावून दिल्या निषेधाच्या घोषणा
युवा पॅंथर व इतर संघटनांसह अनेक समविचारी नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान ही मशाल रॅली निघाली. रॅलीत सहभागी नागरिकांनी केंद्र सरकारचा निषेध करणारे फलक उंचावून निषेधाच्या घोषणा दिल्या. रॅली आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. तसेच "नागरिकता सिद्ध करण्यासाठी आम्ही कोणतेही कागदपत्र सादर करणार नाही,' अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.

हेही वाचा : धक्कादायक... "या' शहरात सर्वाधिक मद्यपी वाहनचालक

संपूर्ण महाराष्ट्रात काढणार रॅली
या वेळी युवा पॅंथरचे आतिश बनसोडे म्हणाले, आज भारतामध्ये मोदी व अमित शहा सरकार सत्तेचा माजस्तोम करीत आहे. ज्या भारतामध्ये आजही बेरोजगारी, गरिबी असे अनेक प्रश्‍न असताना नागरिक सुधारणा विधेयक आणण्याचे प्रयोजन काय आहे? छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले अन्‌ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गणराज्य निर्माण केले. देशात जातीय दंगली घडवण्याचा हेतू ठेवून शिवराय व आंबेडकरांचा विचार व वारसा मोडीत काढण्याचा डाव आखला जात आहे. असंवैधानिक कायदे बहुमताच्या आधारे संसदेत मंजूर करून राज्यघटनेची पायमल्ली करत मनमानी कारभार करणाऱ्या भाजप सरकारला "स्वराज्य ते गणराज्य' ही मशाल रॅली चपराक असेल. याची मुहूर्तमेढ सोलापुरात आज रोवली आहे. हे विधेयक जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे रॅली काढण्यात येतील.

हेही वाचा : नामुष्की...! सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपचा प्रस्ताव फेटाळला

विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिकांचा सहभाग
मोर्चात विविध समाजाच्या नेत्यांनी नागरिक सुधारणा कायद्याविरोधात आपली मते व्यक्त केली. राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप करण्यात आला. या वेळी युवा पॅंथरचे सत्यजित वाघमोडे, अनुराग सुतकर, सोहन लोंढे, सुमीत शिवशरण, राज सलगर, सुहास कदम आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar of the constitutionalists