इंटरनेटवर ज्योतिषी शोधत असला तर, आधी ही बातमी वाचा!

टीम ई-सकाळ
रविवार, 8 सप्टेंबर 2019

 यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भोंदूगिरी करणाऱ्याने पुण्यातील एका महिलेला लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी त्याला राजस्थानातून अटक केली आहे.

पुणे : हल्ली कोणतीही गोष्ट शिकायची झाली. सल्ला घ्यायचा असला की, लोक इंटरनेटचा आधार घेतात. युट्यूब तर त्यात सगळ्यात जास्त पॉप्युलर. पण, कधी कधी हे इंटरनेट घातक ठरतं. पुण्यातील कोंढव्यातील एका महिलेला याचा प्रत्यय आला आहे. यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भोंदूगिरी करणाऱ्याने त्या महिलेला लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आणखी वाचा : पुण्यात चोरी करायला ते यायचे विमानाने

घरातील कटकटींमुळे घेतला ज्योतिषाचा आधार
घरातील कटकटींना कंटाळलेल्या एका महिलेला युट्यूबवरून सल्ले देत, त्या भोंदूने 1 लाख 6 हजार रुपये लुटले आहेत. त्याला सायबर शाखेने राजस्थानातून अटक केली. शुभम सेतीया (वय २१, रा. श्रीगंगानगर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने अशाप्रकारे 30 ते 40 जणांची फसवणूक केल्याची शक्‍यता आहे. फिर्यादी महिलेच्या घरामध्ये कायम भांडणे, वादावाद सुरू होता. यापासून सुटका करून घेण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा, असे तिला सुचले. त्यामुळे तिने युट्यूबर सर्च केल्यानंतर ज्योतिष शास्त्राची जाहिरात पाहिली. त्यात घरात सुख, शांती आणली जाईल, भांडणे संपतील असे सांगितले जात होते. त्यामुळे या महिलेने या जाहिरातीतील नंबरवर संपर्क साधला.

आणखी वाचा : लिंक उघडताच दीड लाख रुपये झाले डेबिट

आणखी वाचा : बायकोचा फेसबुक फ्रेंड निघाला चोर!

राजस्थानात जाऊन ठोकल्या बेड्या
फोनवरील व्यक्‍ती ज्योतिषी असल्याचे सांगितल्यावर कौटुंबिक अडचणी त्याला सांगितल्या. त्यावेळी ज्योतिषाने "तुझ्यावर काळी जादू झाली आहे. योग्य सल्ला घेतला नाही तर, आणखीन त्रास होईल अशी भिती घातली. यासाठी तुला होम हवन. पूजा करावी लागेल, असे सांगून. वेळोवेळी ऑनलाईन 1 लाख 6 हजार रुपये घेतले. हा ज्योतिष वारंवार पैसे घेतल असला तरी, घरातील स्थिती बदलत नसल्याने तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार महिलने कोंढवा पोलिसांकडे तक्रार केली. सायबर शाखेने याचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे, उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांनी तांत्रिक तपास करत ई-वॉलेट व मोबाईल यावरून आरोपीचा शोध सुरू केला. हा आरोपी राजस्थानात श्रीगंगानगर येथे असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी त्याला तेथे जाऊन बेड्या ठोकल्या. सेतीयाकडे केलेल्या चौकशीत त्याने राजस्थानात बसून, देशभरातील किमान 30 ते 40 जणांना गंडविल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून एक लाख सहा हजार रूपये आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ज्योतिषी असल्याचे सांगून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर सेलकडे तक्रार करावी, असे आवाहन उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youtube jyotish fraud pune woman 1 lakh rupee cyber crime rajasthan