मास्क न लावल्यामुळे पाचशेचा दंड; वकीलाने मागितली दहा लाखांची नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

याचिकेनुसार निव्वळ शिक्षेची रक्कमच नव्हे तर नुकसानभरपाई म्हणून तब्बल 10 लाख रुपयांचा दावादेखील केला आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांवर आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत चालली असताना प्रशासनाने आपले नियमदेखील कडकपणे राबवण्यास सुरवात केली आहे. 
कोरोना प्रादूर्भावाला अटकाव घालण्यासाठी मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिगचे पालन करणे अनिर्वाय आहे. हे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना प्रशासन दंड आकारत आहे. मात्र, दिल्लीतील एका व्यक्तीला मास्क न लावल्यामुळे झालेल्या दंडाला न्यायलयातच आव्हान दिले आहे.

संबधित व्यक्ती आपल्या कारने दिल्लीमध्ये चेहऱ्यावर मास्क न लावता प्रवास करत होती. पोलिसांनी सदर व्यक्तीला रोखले आणि मास्क न लावल्याबद्दल 500 रुपयांचा दंड केला. यावर कहर म्हणजे या व्यक्तीने या शिक्षेविरोधात न्यायलयात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार निव्वळ शिक्षेची रक्कमच नव्हे तर नुकसानभरपाई म्हणून तब्बल 10 लाख रुपयांचा दावादेखील केला आहे. 

हेेही वाचा - गुजरातमध्ये मराठी कोरोनाबाधिताचा मारहाणीत मृत्यू; व्हायरल व्हिडिओनंतर नातेवाईकांचा आरोप

दिल्लमध्ये राहणारे सौरभ शर्मा हे पेशाने वकील आहेत. ते 9  सप्टेंबरला आपल्या कारने एकटेच प्रवास करत होते. मात्र त्यांनी मास्क लावला नव्हता. यावेळी गीता कॉलनी परिसरात पोलिसांनी त्यांना अडवले. आणि मास्क न लावल्याची शिक्षा म्हणून 500 रूपयांचा दंड ठोठावला. कारमध्ये एकट्याने असताना मास्क वापरायची गरज नाही, असे सौरभ शर्मा यांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्यांच्याकडून दंड वसूल केला. 

हेही वाचा - विरोधकांच्या गोंधळातच राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर

या प्रसंगाने चिडलेल्या सौरभ यांनी याविरोधात याचिकाच दाखल केली. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, कार हे त्यांचे खासगी क्षेत्र आहे, सार्वजनिक नाही. त्यामुळे एकट्याने प्रवास करताना मास्क लावण्याची तुलना ही सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याशी केली जाऊ शकत नाही. या याचिकेत केवळ त्यांनी शिक्षेची रक्कमच नाही तर मानसिक छळ केल्याचा आरोपही पोलिसांवर केला आहे. आणि नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये देखील मागितले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advocate fined rs 500 not wearing mask car moves delhi hc seeking 10lakh compensation