हैदराबाद प्रकरण : पोस्टमॉर्टमसाठी 'एम्स'नं डॉक्‍टरांना पाठवलं हैदराबादला!

वृत्तसंस्था
Sunday, 22 December 2019

तज्ज्ञ डॉक्‍टरांची ही समिती हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चारही आरोपींच्या मृतदेहांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करतील.

नवी दिल्ली : हैदराबादमधील कथित पोलिस चकमकीत ठार झालेल्या चार आरोपींच्या मृतदेहांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यासाठी एम्सकडून तीन डॉक्‍टरांच्या पथकाची रविवारी (ता.22) नियुक्ती करण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या शवविच्छेदनासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा आदेश शनिवारी तेलंगण उच्च न्यायालयाने दिला होता.

तेलंगणच्या विशेष मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. आदर्शकुमार आणि डॉ. अभिषेक यादव या तीन न्यायवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. गुप्ता हे या समितीचे नेतृत्व करतील. तर डॉ. वरुण चंद्र हे शवविच्छेदना वेळी समितीला साह्य करतील. 

- INDvsWI : भारताचा 'विराट' विजय; तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकली!

तज्ज्ञ डॉक्‍टरांची ही समिती हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता चारही आरोपींच्या मृतदेहांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करतील. ही समिती 22 डिसेंबर रोजी हैदराबादला रवाना होईल, तर 23 डिसेंबर रोजी दिल्लीला माघारी परतणार आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. 

कथित पोलिस चकमकीत ठार झालेल्या आरोपीचे मृतदेह हैदराबादमधील सरकारी रुग्णालयात जतन करून ठेवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. ही चकमक बनावट असल्याचा दावा करणाऱ्या याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता.

- नागरिकत्व सुधारणा विधेयकावर डाॅ. अमोल कोल्हे म्हणाले...

या चारही आरोपींच्या मृतदेहांचे 23 डिसेंबर रोजी एम्सच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाकडून दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात यावे आणि त्याचा अहवाल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे सादर करण्यात यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने शनिवारी दिला होता. दुसऱ्यांदा शवविच्छेदन झाल्यानंतर चारही आरोपींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त करावेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

- पुणे : आईला मोबाईलवरून 'बाय बाय' म्हणत विवाहितेने केली आत्महत्या

हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्‍टर असलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी चार आरोपींना पोलिसांनी अटक केले होती. सहा डिसेंबर रोजी चकमकीत चारही आरोपी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIIMS sent forensic expert to Hyderabad for autopsy on bodies of rape accused