Breaking : केंद्र सरकारचा आदेश; 'सीबीएसई आणि जेईई'च्या परीक्षा पुढे ढकलल्या!

वृत्तसंस्था
बुधवार, 18 मार्च 2020

सर्व परीक्षांचा विषय मार्गी लागलेला असताना शाळांच्या परीक्षांचे काय, याबाबत स्पष्टता नसल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली / पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संसर्गाच्या भीतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक हे ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल, असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन देखील या काळामध्ये बंद राहील असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. याबरोबर शाळा, विद्यापीठ, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती मानव संसाधन मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.

- Coronavirus : रेल्वे, बस, मेट्रोबाबत असा आहे सरकारचा ‘५०-५० फॉर्म्युला’!

नववीपर्यंतच्या परीक्षांचा निर्णय शाळास्तरावरच

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याचा परिणाम शाळांच्या वार्षिक परीक्षांवरही झाला आहे. एप्रिल महिन्यात बहुतांश शाळांच्या परीक्षा होत असतात; पण कोरोनामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की त्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा याचा निर्णय शालेय प्रशासनच घेईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

- Coronavirus : कोरोनाग्रस्त पेशंटना दिला जातोय 'हा' स्पेशल मेन्यू!

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील शाळांनी आठवडाभर शाळांना सुटी जाहीर केली होती. मात्र, राज्यभरात रुग्णांची संख्या वाढत चालल्याने राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधील विभागांना सुटी देण्याचे आदेश दिले होते. दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात काहीही बदल न केल्याने परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. तर, पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठांनी त्यांच्या मार्चअखेरपर्यंतच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

- Coronavirus : 'या' रक्तगटातील लोक ठरले सर्वाधिक कोरोनाचे बळी; संशोधकांचा निष्कर्ष!

दरम्यान, सर्व परीक्षांचा विषय मार्गी लागलेला असताना शाळांच्या परीक्षांचे काय, याबाबत स्पष्टता नसल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यावर पुण्यातील काही शाळांनी बैठक घेऊन नेमके काय करायचे यावर चर्चा केली, त्यात काहींनी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही शाळांनी शिक्षण विभागाकडे चौकशी करून त्यानुसार निर्णय घेण्याचे ठरले आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे केवळ 10वी व 12वीच्या परीक्षा घेतल्या जातात. पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व परीक्षा शाळेच्या स्तरावर होतात, त्यामुळे या वर्गांच्या वार्षिक परीक्षा घ्यायच्या की नाही ते शाळा स्तरावरच ठरवू शकतात. त्यात आमचा हस्तक्षेप असणार नाही. ज्या शाळांना परीक्षा घ्यायच्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देऊ शकतात. 
- विशाल सोलंकी, आयुक्त 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All ongoing examinations of CBSE shall be rescheduled after 31st March