Coronavirus : रेल्वे, बस, मेट्रोबाबत असा आहे सरकारचा ‘५०-५० फॉर्म्युला’!

CM_Uddhav_Thackeray
CM_Uddhav_Thackeray

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, गर्दी नियंत्रित असावी, यासाठी सरकारी कार्यालयांत उद्यापासून ५० टक्‍के कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित असतील. आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. मात्र, या काळात गरज पडल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही क्षणाला कार्यालयात उपस्थित राहावे लागणार असल्याने सुटी समजून घराबाहेर जाता येणार नसल्याची खबरदारीही राज्य सरकारने घेतली आहे. 

दरम्यान रेल्वे, एसटी बस, खासगी बस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवासी बंद करण्यात येतील. तसेच प्रवासी अंतराने बसावेत, यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरामध्ये बसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. 

राज्य सरकारने रस्त्यावरील गर्दी कमी व्हावी, वाहतुकीवरील ताण कमी व्हावा आणि संसर्ग टाळला जावा, याच्यासाठी यापूर्वीच शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत. मात्र, तरीही लोकल आणि बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यास लोक घराबाहेर पडत असल्याची चिंता राज्य सरकारला वाटते आहे. त्यामुळेच सरकारी कार्यालयातील गर्दी काही प्रमाणात नियंत्रित करावी.

मात्र, सरकारी कामांचा खोळंबा होऊ नये, यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून सरकारी कार्यालयांमध्ये कमीत कमी ५० टक्‍के उपस्थिती राहावी, यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. यासाठी विभागाने आळीपाळीने कर्मचाऱ्यांना आवश्‍यकतेनुसार कार्यालयामध्ये बोलवावे, तसेच कर्मचाऱ्यांनी प्रलंबित कामे उपस्थित असताना पूर्ण करावीत.

कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावर कर्मचाऱ्यांना बोलावताना वेळेबाबतही लवचिकता ठेवावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळा टाळूनही कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहता येणार आहे. 

मात्र, या काळात कर्मचाऱ्यांना त्यांचा निवासस्थानाचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यालयात द्यावा लागणार आहे. कोणत्याही वेळेला कार्यालयाकडून बोलावणे आल्यास कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच, त्यांना संपर्क ठिकाण सोडता येणार नसल्याचीही सक्‍त सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत. 

शहरातील दुकानांच्या वेळा अशा तऱ्हेने ठरविण्यात येतील, की सर्व दुकाने अंतराअंतराने सकाळी व दुपारी सुरू राहतील. बाजारातील तसेच गर्दीच्या ठिकाणातील रस्ते यामध्येदेखील एक दिवसाआड किंवा वेळांमध्ये बदल करण्यात येईल. 

साधनसामग्रीची उपलब्धता 

दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामग्री उपलब्ध राहील, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आवश्‍यक तेवढ्या अलगीकरण कक्ष व विलगीकरण कक्षांची सोय करण्यात आली आहे. आवश्‍यक ती वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेशन, मास्क तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक सुरक्षा साधने, औषध सामग्रीदेखील उपलब्ध आहे. 

राज्य सरकारच्या सर्व कार्यालयांना या सूचना लागू असल्या, तरी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यासह प्रशासकीय नियंत्रणातील कार्यालयांना हा आदेश लागू नाही. त्याचबरोबर क्षेत्रीय स्तरावर ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा भाग म्हणून इतर कार्यालयांना भेटी देणे अत्यावश्‍यक असल्यास असे अधिकारी तसेच आप्तकालीन अथवा अत्यावश्‍यक सेवा देणारे कार्यालय यांनाही हा आदेश लागू नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com