तब्बल १५० दिवसांपासून आसाममध्ये धगधगतेय आग

तब्बल १५० दिवसांपासून आसाममध्ये धगधगतेय आग

मुंबई : ९ जून २०२० रोजी भडकलेली आसाममधील बघजान भागातील आग अजूनही धगधगतेय. आज १५० दिवस उलटूनही ही अजूनही कायम आहे. त्यामुळेच तब्बल दिडशे दिवस होऊनही कायम धगधगणारी ही आग भारतातील सर्वाधीक दिवस धगधगणारी आग ठरलीये. OIL म्हणजेच ऑइल इंडिया लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आगीनंतर तब्बल १२ कुटुंबाना त्यांच्या घराच्या मोबदल्यात पंचवीस लाख रुपये आणि त्यांच्या मासिक उदरनिर्वाहासाठी पन्नास हजारांची भरपाई देण्यात आली आणि त्यांना आपापल्या घरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

मात्र, काही स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कंपनीकडून त्यांना केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे पैसे मिळत असल्याचं बोललं जातंय. त्यांच्या घरांचे आणि त्यांच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई त्यांना अद्याप मिळालेली नाही. दांडेश्वर बोराह या ४० वर्षीय शेतकऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आता यामध्ये दोष कुणाचा ? तुम्हाला काय वाटतं ? 

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बघजान भागातील तेल क्षेत्रात ९ जून रोजी ही आग भडकली होती. आज तब्बल १५० दिवसानंतर देखील ही आग अजूनही धगधगतेय. 

ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेलाच्या विहीर नंबर ५ मध्ये स्फोट होऊन २७ मे २०२० रोजी मोठा भडका उडाला होता. सुरुवातीला ही आग विझवण्याचे बरेच प्रयत्न झालेत. मात्र या आगीमुळे तब्बल तीन हजार नागरिकांना आपापली घरे सोडून तात्पुरत्या घरांमध्ये राहण्यास नेलं गेलं.

 पुढे याबाबत हरित लवादाने चौकशी सुरु केली असता त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. बघजानमधील तेल विहीर आणि आणखीन अशाप्रकारच्या २६ विहिरी या अनधिकृतपणे सुरू होत्या. हरित लवादाच्या प्राथमिक आभ्यासात ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीकडून त्यांच्या योजना आणि अंमलबजावणीमध्ये तफावत असल्याचं आढळून आलं. 

या आगीमुळे निर्माण होणारी उष्णता, आगीमुळे निघणारा धूर आणि सातत्याने होणाऱ्या स्फोटांच्या आवाजामुळे हा भाग राहण्यासाठी अतिशय घातक बनला आहे. या आगीमुळे अनेकांना आरोग्याचा समस्या देखील जाणवू लागल्यात. ज्यामध्ये डोळ्यांची जळजळ, मायग्रेन, सातत्याने भीती वाटणे किंवा भूक न लागणे यासारख्या समस्या जाणवू लागल्यात. 

आतापर्यंत ही आग विझवण्याचे अनेक प्रयत्न केले गेलेत. मात्र तब्बल पाच महिन्यांनंतर अजूनही या आगीवर नियंत्रण आलेलं नाही. या आगीमुळे या भागाचे, या भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचे त्याचसोबत इथल्या नागरिकांचे, त्यांच्या घरांचे आणि आसपासच्या परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाने याबाबत माहिती देताना ही आग विझवण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेलेत याबाबत माहिती दिली आहे. ही आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेलेत. ही आग विझवण्यासाठी सिंगापूरमधील अलर्ट डिझास्टर कंपनीशी देखील चर्चा झाली. मात्र ही आग विझवण्यात अजूनही यश आलेलं नाही.

कंपनीकडून अजूनही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मोठमोठ्या तेलविहिरींवर आग विझवण्यासाठी ज्या खास 'स्नूबिंग' पद्धतीचा वापर करण्यात येतो त्या पद्धतीचा आता ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.  

या गावातील अनेकजण त्यांच्या घरी आता परतलेत, मात्र या आगीपासून जवळ राहणारी अनेक कुटुंब आजही आपल्या घरापासून दूर असणाऱ्या तात्पुरत्या घरांमध्ये राहत आहेत.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Assam fire Baghjan oil longest burning gas 150 days destroying lives

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com