भाजप, संघानेच केला माझ्यावर हल्ला: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हा भाजप आणि आरएसएसनेच केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसची राजकारण करण्याची हिच पद्धत आहे. यावर काय बोलणार?

नवी दिल्ली - गुजरातमधील धनेरा येथे माझ्या कारवर करण्यात आलेला हल्ला हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच (आरएसएस) केला असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

गुजरातमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्या मोटारीवर शुक्रवारी दगडफेक करण्यात आली. सुदैवाने दगडफेकीत राहुल गांधी यांना कोणतीही इजा झाली नाही. धनेरातील हेलिपॅडकडे जात असताना एका व्यक्तीने राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक केली. दगडफेकीत मोटारीच्या मागील काचा फुटल्या. गांधी यांनी छोटे; पण आवेशपूर्ण भाषण केले होते.

आज (शनिवार) हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर थेट हल्ला करत हा हल्ल्या त्यांनीच केल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले, की माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हा भाजप आणि आरएसएसनेच केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसची राजकारण करण्याची हिच पद्धत आहे. यावर काय बोलणार? जे लोक स्वतःच हे काम करतात, ते अशा घटनांचे निषेध करत नाहीत.

राहुल गांधी यांनी हल्ल्यानंतरही मोदींवर टीका करताना म्हटले होते, की काळे झेंडे, मोदींच्या नावाच्या घोषणा किंवा दगडफेकीमुळे मी मागे हटणार नाही. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी म्हणाले, ''भाजपच्या गुंडांनी हे भ्याड कृत्य केले आहे. राहुल गांधी यांच्या ताफ्यातील अनेक मोटारींचे नुकसान झाले आहे. मोटारींच्या काचा फुटल्या असून विशेष सुरक्षा पथकातील एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पूरग्रस्त भागात गेल्याबद्दलच हे सारे करण्यात आले.''

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Attack on my car carried out by BJP-RSS people, says Rahul Gandhi