सरकारकडून शेतकरी आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न

Agitation
Agitation

नवी दिल्ली - सरकारने कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पकडून तुरूंगात टाकण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करावी, असे भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. दरम्यान पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवी यांची अटक हा शेतकरी आंदोलन कमकुवत करण्यासाठी केलेला निंदनीय प्रयत्न आहे, अशा शब्दांत संयुक्त किसान मोर्चाने या अटकेचा निषेध केला आहे.

आंदोलन चिरडण्याचे सारे प्रयत्न सरकारकडून होत असून दिशा रवी यांची अटक त्याचाच भाग असून, त्यांची सरकारने त्वरित मुक्तता करावी अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने अध्यक्ष दर्शन पाल यांनी केली. नवीन कायद्यांमुळे देशाच्या कृषी संरचनेतच दूरगामी व घातक बदल होतील याबाबत दिशा रवी यांच्यासारखे अनेक पर्यावरण कार्यकर्ते चिंतीत आहेत. त्यांनाच सरकार तुरूंगात टाकत आहे, हे निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्याना संबोधित करताना टिकैत यांनी, कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहील व सरकारला दोन ऑक्‍टोबरची मुदत दिली आहे, याचा पुनरूच्चार केला. कृषी कायद्यांमुळे खाद्यान्नाची सार्वजनिक वितरण व्यवस्था खलास होईल व यामुळे केवळ छोटे-मोठे शेतकरीच नव्हे तर, बाजार समित्यांतील कर्मचारी, कृषीपूरक उद्योगांतील कामगार व रोजंदारी मजूर व इतर वर्गांवरही अनिष्ट परिणाम होईल असे टिकैत यांनी सांगितले. भगवान हनुमान, महात्मा गांधी यांच्यासारख्या ‘आंदोलनजीवी’ व्यक्तिमत्त्वांबद्दल नरेंद्र मोदी सरकारला काय म्हणायचे आहे, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला व रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवानी यांची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीची वेळ आली तेव्हा त्यांच्यावर अयोध्या प्रकरणी खटला पुन्हा सुरू केला गेला असे सांगितले.

तीव्रता कमी नाही
दरम्यान, ता. २६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर सिंघू व टिकरी बरोबरच गाझीपूर सीमेवरील आंदोलकांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून अनेक आंदोलक गावांकडे परतत आहेत, याचा अर्थ आंदोलनाची तीव्रता कमी झाली असा नाही याचा शेतकरी नेत्यांनी पुनरूच्चार केला. टिकैत म्हणाले की शेतकऱ्यांनी एक डोळा आंदोलनाकडे व दुसरा डोळा आपल्या शेतीकडे ठेवावा असे आवाहन मी स्वतःच केले होते. केंद्र सरकारच्या अहंकारामुळे शेतकऱ्यांना गेले ७० दिवस दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसावे लागले. तथापि आंदोलनामुळे शेतीची कामे महिनोंमहिने सोडणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचेही टिकैत म्हणाले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com