बिबट्याने भरदिवसा गावात शेतकऱ्यांना रस्त्यात अडवले

यादवकुमार शिंदे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सोयगावचे जंगल घनदाट झाले आहे. परंतु जंगलातही मानवी हस्तक्षेप वाढल्याने जंगलात हिंसक वन्यप्राण्यांना मुक्तपणे वावरता येत नसल्याने या प्राण्यांना जंगलही अपुरे पडत असल्याने वन्यप्राण्यांनी मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. 
- शिवाजी काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव  

जरंडी : वेताळवाडीच्या जंगलातून शहर परिसरात बुधवारी (ता. १६) भरदिवसा बिबट्याच्या दोन नवजात पिलांनी शहराच्या हाकेच्या अंतरावर दुपारी शेतात जाण्याच्या रस्त्यात आडवे होऊन शेतकऱ्यांचाच रस्ता रोको केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती.  

सोयगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील घनदाट झाडी जवळ असलेल्या शेताच्या रस्त्यावर बिबट्याच्या दोन पिलांनी मुक्तसंचार करून शेतकऱ्यांचा रास्तारोको केल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, तत्काळ काही शेतकऱ्यांनी घडलेला प्रकार वनविभागाच्या कार्यालयात कळविल्याने तातडीने वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होताच बिबट्याच्या पिलांनी पळ काढला, वनविभागाच्या पथकाने या पिलांच्या पावलांचा ठसे घेवून माग काढला असता, वेताळवाडीच्या जंगलात पिलांनी पळ काढल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान गेल्या दोन दिवसापासून वेताळवाडीच्या जंगलाला लागून असलेल्या सोयगाव शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. 

रात्रीच्या सुमारास सोयगाव-जरंडी रस्त्यावर काही वाहनधारकांना बिबट्याचे जवळून दर्शन झाल्याचे भगवान वाघ या वाहनधारकांनी सांगितले. याप्रकारामुळे शहरभर घबराट उडाली आहे. दरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून या भागात शेतकऱ्यांनी एकट्याने वावरू नये, गटागटाने या भागातून पायी प्रवास करावा अशा सुचना वनविभागाने शेतकऱ्यांना केल्या आहे. दरम्यान दुपारच्या घटनेमुळे सोयगाव शिवारातील मजूर घटनेची माहिती मिळताच दुपारपुर्वीच घरी परतले, वेताळवाडीच्या जंगलात बिबट्या मादीने दोन पिलांना जन्म दिला असून चवताळलेली मादी रस्त्यावर येवून आक्रमक होत आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधपणे वावरावे व सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: aurangabad marathi news leopard stops farmers road