जय श्रीराम! अयोध्येत मंदिरासाठी 25 दिवसात जमा झालेत 1 हजार कोटी

टीम ई सकाळ
Wednesday, 10 February 2021

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या बांधकामासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देशात देणी गोळा करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे.

अयोध्या - अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या बांधकामासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून देशात देणी गोळा करण्यासाठी मोहिम राबवली जात आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी दिला आहे. देशातून जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त श्री विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली. ते कर्नाटकातल्या उडुपीतील पेजावर मठाचे मठाधिपती आहेत. 

राम मंदिर बांधकामासाठी केंद्र सरकारकडून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या मदतीनं ट्रस्ट काम करत आहे. ट्रस्टच्यावतीने देशात 15 जानेवारीपासून देणगी गोळा करण्याची मोहिम सुरु केली आहे. आतापर्यंत ट्रस्टकडे जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. 

हे वाचा - भाजपची नाव बुडण्यापासून वाचवता येणार नाही; नेत्यांनी दिला घरचा आहेर

श्री विश्वप्रसन्न महाराज यांनी सांगितलं की, दक्षिण भारतातील जनतेनं देणगीच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यामुळे खूप आनंद झाला आहे. निधी गोळा करण्यासाठी बराच प्रवास केला. यावेळी समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी मदत केली आहे. मंदिर उभारणीसाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त मंदिर उभारणं आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती स्थापन करणं इतकाच ट्रस्टचा उद्देश नाही. आदर्श, कल्याणकारी असं राज्य प्रस्थापित कऱणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचंही विश्वप्रसन्न महाराजांनी सांगितलं.

मंदिरांच्या जागी अतिक्रमणावर बोलताना विश्वप्रसन्न महाराज म्हणाले की, राज्यातील सर्व मंदिरं संरक्षित करायला हवीत. यामुळे अशा जागांवर कोणी अतिक्रमणाचा विचार कऱणार नाहीत आणि पुढे जाऊन वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. 

हे वाचा - सरकार नेमतंय ऑनलाइन स्वयंसेवक; सोशल मीडियावर ठेवणार नजर

आरक्षणाच्या मुद्दयावरही विश्वप्रसन्न महाराजांनी मत व्यक्त केलं आहे. जातीवर आधारीत आरक्षण देणं योग्य नाही. यामध्ये व्यक्तीची आर्थिक परिस्थिती पाहून आरक्षण द्यायला हवं. प्रत्येक समाजातील लोकांनी त्यांच्या जातीला विशेष दर्जा देण्याची मागणी करणाऱ्यांविरोधात पुढे यायला हवं असंही विश्वप्रसन्न महाराज म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya ram mandir building construction donation 1 thousand cr