'बाबा का ढाबा'च्या मालकाच्या बँक खात्यात 42 लाख; पैशांवरच्या वादावर पोलिसांचा रिपोर्ट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

'बाबा का ढाबा' वादाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काल साकेत कोर्टामध्ये अहवाल सादर केला आहे.

नवी दिल्ली : 'बाबा का ढाबा' वादाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी काल साकेत कोर्टामध्ये अहवाल सादर केला आहे. यामध्ये पोलिसांनी सांगितलंय की, बाबांच्या खात्यात 42 लाख रुपये जमा झाले होते. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी कोर्टात एक याचिका दाखल करुन या साऱ्या आर्थिक घडामोडींचा हिशेब मागितला होता. तर दुसरीकडे या प्रकरणी दिल्ली पोलिस युट्यूबर गौरव वासन यांच्या बँक खात्यांची तपासणी करत आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली गेली नाहीये. तसेच कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये.

युट्यूबर असलेल्या गौरव वासन यांनी सोशल मीडियावर या बाबांना मदत करण्याचे आवाहन करत आपल्या आणि आपल्या पत्नीचा अकाऊंट नंबर शेअर केला होता. गौरव वासन यांनी मदत म्हणून जमा झालेले सगळे पैसे बाबांना दिले होते. मात्र 4.20 लाख रुपयांवरुन वाद निर्माण झाला होता. या वादावरुनच बाबाने मालवीय नगर पोलिस ठाण्यात गौरव वासन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही बाबी समोर येत आहेत. गौरव वासन यांनी आणखी काही बँक खात्यांचे नंबर दिले होते, त्याची देखील तपासणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा - ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

कांता प्रसाद यांनी ही तक्रार दाखल करताना म्हटलं होतं की, ही धमकी देणारा व्यक्ती स्वत:ला गौरव वासन यांचा भाऊ असल्याचं सांगत होता. मात्र, रेस्टॉरंटच्या उद्घाटनावेळी कांता प्रसाद यांनी म्हटलं  होतं की ते गौरव वासन यांच्यामुळेच इथवर पोहोचले आहेत.

तर दुसरीकडे बाबा का ढाबा नावाने रस्त्याच्या कडेला छोटं दुकान चालवणाऱ्या बाबांनी आता या मदतीच्या जोरावर नवे रेस्टॉरंट उघडलं आहे. या नव्या रेस्टॉरंटमध्ये आता हळूहळू लोक येत आहेत. कांता प्रसाद यांनी यासंदर्भात म्हटलंय की, ग्राहक कमी येत आहेत मात्र, ऑनलाईन पद्धतीने अनेक ऑर्डर्स प्राप्त होत आहेत. यातील अधिकतर लोक चायनिज खाद्यपदार्थ मागवत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी कांता प्रसाद यांच्या तक्रारीनंतर खटला दाखल केला होता. कांता प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी आली असल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baba ka dhaba 42 lakh rupees deposited in owner bank account police filed status report