बांगलादेशाचे सैनिक प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणार सहभागी

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 3 January 2021

त्याचबरोबर यंदा राजपथावर नागरिकांची संख्या कमी असेल. केवळ 25 हजार जणांना परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गतवर्षी ही संख्या 1 लाखांहून अधिक होती.

नवी दिल्ली-  देशाच्या प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु आहे. यंदा या संचलनात बांगलादेशाचे लष्करही सहभागी होणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात विदेशातील सैन्य सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असेल. चार वर्षांपूर्वी 2016 मध्ये राजपथवर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात फ्रान्सच्या सैनिकांनी भाग घेतला होता. त्यावेळी फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

राजपथवर दुसऱ्यांदा विदेशी सैनिक करतील मार्च
वर्ष 2016 च्या संचलनात फ्रान्सच्या 130 सैनिकांनी मार्च केला होता. आता दुसऱ्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त विदेशी सैनिकांचे राथपथावर मार्च होणार आहे. यामध्ये बांगलादेशचे सैनिक भाग घेतील. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बांगलादेशाचे 96 सैनिक दिल्लीत येत आहेत. ते BD-08 रायफल घेऊन मार्च करतील. या रायफलची निर्मिती चीनने केली असून 817.62 एमएम असॉल्ट वेपन असून लायस्नस प्रॉड्यूस्ड व्हेरियंट आहे. 

हेही वाचा- दारुच्या नशेत पोलिसांना केला फोन, पंतप्रधानांना दिली जीवे मारण्याची धमकी

बांगलादेशच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात दरवर्षी 10,000 असॉल्ट रायफल्सचे उत्पादन होते. पाकिस्तानपासून वेगळे होऊन बांगलादेशला 50 वर्षे होत आहेत. त्याचवेळी भारताने बांगलादेशला संचलनासाठी बोलावले आहे. 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र होण्यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका निभावली होती. यासाठी बांगलादेशाने भारताचे अनेकवेळा आभार मानले आहे. 

प्रजासत्ताक दिनावर कोरोनाचे सावट
यावेळी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने तसेच तेथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जॉन्सन यांचा दौरा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा- Fastag म्हणजे नेमकं काय रे भाऊ? कसं मिळवाल आणि कधीपर्यंत असते वॅलिडिटी?

त्याचबरोबर यंदा राजपथावर नागरिकांची संख्या कमी असेल. केवळ 25 हजार जणांना परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गतवर्षी ही संख्या 1 लाखांहून अधिक होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिक आपल्या कुटुंबासह येत असतात. परंतु, यंदा 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना संचलन पाहण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladeshi military will participate in the indian republic day parade