
पंतप्रधानांना मारण्यासाठी 30 कोटी रुपयांची सुपारी देणार असल्याचे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले.
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकीच्या फोननंतर दिल्ली पोलिसांत एकच खळबळ उडाली होती. पंतप्रधानांना मारण्यासाठी 30 कोटी रुपयांची सुपारी देणार असल्याचे या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्वरीत तपासाची चक्रे फिरवत फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचे नाव पिंटूसिंह असून त्याचे वय 30 वर्षे असल्याचे सांगण्यात येते.
पिंटूसिंह हा सुतारकाम करतो आणि दिल्लीतील सागरपूर परिसरात राहतो. पिंटूसिंह हा दारुच्या नशेत होता. त्यातच त्याने पोलिसांना धमकीचा फोन केला होता, असे सांगण्यात येते. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे तपासात आढळून आले आहे. दिल्लीतील राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांना त्याच्या घरातून औषधे आढळून आली आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे.
हेही वाचा- दिल्लीत पावसाने वाढवला थंडीचा कहर; आंदोलनातील शेतकरी मागण्यांवर ठाम
देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे पोलिसांचे धाबे दणाणले होते. वरिष्ठ पातळीवरुन तपासाची चक्रे फिरली आणि संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
यापूर्वीही नोव्हेंबर महिन्यातही दिल्ली पोलिसांना पीसीआरवर फोन करुन एका व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांची हत्या करणार असल्याची धमकी दिली होती. नितीन असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यानेही दारुच्या नशेत पोलिसांना धमकीचा फोन केला होता. पोलिसांच्या तपासात हा फोन दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर ठाण्यातील दक्षिणपुरी परिसरातून आल्याचे समजले होते. पोलिसांनी नितीनला ताब्यात घेतले होते, तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत होता.
हेही वाचा- भारताला मोठं यश; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला 'कल्चर' करणारा पहिला देश