BBC IT Raid : इंदिरा गांधींनीही घातली होती BBC वर बंदी; जाणून घ्या वादाचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BBC

BBC IT Survey : इंदिरा गांधींनीही घातली होती BBC वर बंदी; जाणून घ्या वादाचा इतिहास

BBC IT Raid : बीबीसीने काही दिवसांपूर्वीच गुजरात दंगलीसंबंधित एक डॉक्युमेंट्री सादर केली आहे. या डॉक्युमेंट्रीमुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हणत केंद्राकडून याच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आज दिल्लीसह मुंबईतील BBC च्या कार्यालयांवर IT ने छापेमारी केली आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सरकराच्या बंदीनंतरही देशफरातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये याचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावरून दिल्लीतील जेएनयूमध्ये मोठा गदारोळ झाला होता. आज आम्ही तुम्हाला BBC आणि भारत सरकारचे आतापर्यंत कधी-कधी वाद झाले होते आणि त्यात काय कारवाई करण्यात आली होती याबाबत माहिती सांगणार आहोत.

बीबीसी हे लंडन स्थित मीडिया हाऊस आहे. जे गेल्या अनेक वर्षांपासून भारतात पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. नुकत्याच पब्लिश झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 च्या गुजरात दंगलीच्या काही पैलूंचा शोध घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

बीबीसीचा भारत सरकारशी वाद झाल्याची अनेक उदाहरणे असून, यापूर्वीदेखील भारतातील न्यायालयांनी बीबीसीच्या काही कार्यक्रमांवर बंदी घालण्याबरोबरच हे कार्यक्रम भारतात प्रसारित करण्याची परवानगी नाकारली होती.

जेव्हा इंदिराजींनी घातली होती बीबीसीवर बंदी

1970 मध्ये भारताची छबी नकारात्मक पद्धतीने दाखवल्या प्रकरणी इंदिरा गांधींच्या सरकारने बीबीसीवर बंदी घातली होती. यावेळी बीबीसीवर फ्रेंच दिग्दर्शक लुई माले यांची एक माहितीपट मालिका दाखवण्यात आली, यात भारताची प्रतिमा नकारात्मक दाखववण्यात आली होती. यानंतर इंदिरा गांधींनी बीबीसीचे दिल्लीतील कार्यालय दोन वर्षांसाठी बंद केले होते.

निर्भया प्रकरणावरही करण्यात आली होती कारवाई

वरील बंदीशिवाय मार्च 2015 मध्ये बीबीसीने निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींची डॉक्युमेंट्री तयार केली होती. या माहितीपटावरही दिल्ली उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. या माहितीपटात दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्काराचा दोषी मुकेश सिंगला दाखवण्यात आले होते. या माहितीपटाच्या इंटरनेट प्रक्षेपणावरही सरकारने बंदी घातली होती.

2017 मध्ये पुन्हा बंदी

2017 मध्ये बीबीसीला भारतातील राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये शूटिंग करण्यास 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. वन्य प्राण्यांच्या शिकारीशी संबंधित बीबीसीच्या माहितीपटामुळे भारताची प्रतिमा खराब होत असल्याचे सरकारचे म्हणणे होते.

जून 2008 मध्ये भारत सरकार आणि बीबीसीत आणखी एक वाद झाला होता. बीबीसीने वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या मुलांचे पॅनोरमा शोमधील फुटेज दाखवले होते. यामध्ये बालमजुरीला प्रोत्साहन दिल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, चौकशीअंती ही स्ट्रोरी खोटी असल्याचे समोर आले होते.

डायनाची मुलाखत

1995 मध्ये BBC वर राजकुमारी डायनाची मुलाखत दाखवण्यात आली होती. ही मुलाखत जगभरात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या कार्यक्रमांपैकी एक होती. ही मुलाखत बीबीसीच्या मार्टिन बशीर यांनी घेतली होती. ही मुलाखत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली तरीही ही मुलाखत बनावट कागदपत्रांवर आधारित असल्याचे समोर आले होते.

कधी झाली BBC ची स्थापना

18 ऑक्टोबर 1922 रोजी बीबीसीची स्थापना झाली. याचे नाव ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी असे होते. त्यानंतर ही कंपनी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये बदलली गेली. गेल्या काही वर्षांत बीबीसीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, सध्या ही संस्था भारतात हिंदी, बंगाली, तमिळ, गुजराती, मराठी, पंजाबी आणि तेलुगु भाषांसह इंग्रजीमध्ये काम करत आहे.