पूर्णिया हत्या प्रकरण - माझ्यावर कारवाई करा; तेजस्वी यादवांकडून नितीश कुमारांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

एका कार्यकर्त्याच्या खूनाच्या प्रकरणात महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून एनडीएकडून सातत्याने तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव यांच्यावर शाब्दिक टीका केली जात आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच रंग चढला आहे. येनकेन कारणाने विरोधकांना कोंडीत पकडणे आणि त्याद्वारे राजकरण करत आपला प्रभाव मतदारांवर पाडण्याची खेळी तशी काही नवी नाही. बिहारसारख्या राज्यात तर राजकारण आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ ही वादातीत आहे. अशातच, आता राजकीय आरोप शिगेला पोहोचले आहेत. एका कार्यकर्त्याच्या खूनाच्या प्रकरणात महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून एनडीएकडून सातत्याने तेजस्वी यादव व तेजप्रताप यादव यांच्यावर शाब्दिक टीका केली जात आहे. या प्रकरणाचा हत्यार म्हणून वापर करत विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. मात्र, आता यावर उत्तर म्हणून तेजस्वी यादवांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. 

हेही वाचा - ना घर का, ना घाट का; गुप्तेश्वर पांडेंना JDU ने तिकिट नाकारलं
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये शक्ती मलिक या राजकीय कार्यकर्त्याची हत्या झाली होती. या प्रकरणी राजदचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादवसह त्यांचे भाऊ तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याचा राजकीय लाभ घेणाऱ्या विरोधकांना उत्तर म्हणून तेजस्वी यादव यांनी एक पत्र लिहलं आहे. हे पत्र त्यांनी स्वत:च मुख्यंत्री नितीश कुमारांना लिहलं आहे. स्वत:च या प्रकरणातले संशयित आरोपी असताना या पत्राद्वारे त्यांनी योग्य कारवाईची मागणी केली आहे. 

या पत्रात त्यांनी म्हटलंय की, गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्णिया जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्याचा खून झाला होता. मला स्वत:ला त्याची उशीराने माहिती मिळाली होती. कायदा स्वत:चं काम करत आहेच. मात्र, आपले नेते आणि प्रवक्ते अत्यंत निराधार टीका करत आहेत. आपल्या सरकारच्या भुमिकेप्रमाणे यावर कायदेशीरच कारवाई व्हावी. मात्र, आपले लोक बिहारच्याच पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या प्रकरणातील पीडित कुंटुंबाला न्याय मिळावा आणि सत्य बाहेर यावं, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. या प्रकरणची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चौकशी व्हावी. गृहमंत्री म्हणून या प्रकरणी आपण मला अटक करुन चौकशीसाठीही बोलावू शकता. असं म्हणत या पत्राद्वारे एकप्रकारे नितीश कुमारांवर तेजस्वी यादव टीकास्त्र सोडलं आहे. 

हेही वाचा - भाजप नेत्यांची ‘एलजेपी’त आवक; चिराग पासवान यांना साथ

काय आहे हत्येचं कारण? 
याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून हत्येचे कारण समोर आले आहे. पोलिस अधिक्षक विशाल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, शक्ती मलिक व्याजानं पैसे द्यायचे. त्यांना जर  वेळेवर व्याजाचे पैसे मिळाले नाहीत तर ते त्रासही द्यायचे. आफताब यांनीही शक्ती मलिक यांच्याकडून पैसे घेतले होते. ते वेळेवर देऊ न शकल्याने मलिक यांनी आफताब यांचा छळ केला होता. म्हणूनच, आफताब यांनी अन्य आरोपींसोबत मिळून मलिक यांची हत्या केली असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar assembly election tejshwi yadav wrote letter to nitish kumar regarding purniya murder case