
‘डीडीसीए’ला लिहिलेल्या निषेध पत्रात बेदींनी, ‘‘या मैदानातील एका स्टॅंडला दिलेले माझे नाव काढून टाकावे,’’ अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील प्रसिद्ध फिरोजशहा कोटला क्रिकेट मैदानावर (सध्याचे अरुण जेटली मैदान) जेटली यांचा सहा फुटी पुतळा उभारण्याच्या दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (डीडीसीए) निर्णयाला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्रही लिहिले आहे.
‘डीडीसीए’ला लिहिलेल्या निषेध पत्रात बेदींनी, ‘‘या मैदानातील एका स्टॅंडला दिलेले माझे नाव काढून टाकावे,’’ अशी मागणी केली आहे. तसंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ‘नातेवाईकगिरी’च्या निषेधार्थ संघटनेच्या मानद सदस्यत्वाचाही त्याग करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘‘अपयश आणि कलंकाचा उत्सव स्मृतीचिन्ह व पुतळे उभारून करायचा नसतो तर ते विसरून जायचे असते,’’ अशा कडक शब्दांत त्यांनी या प्रकरणावर रोष व्यक्त केला.
हे वाचा - झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर बलात्काराचा गंभीर आरोप; भाजपनं केलं काँग्रेसला टार्गेट
जेटली यांच्या निधनानंतर केंद्र सरकारच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने कोटला मैदानाचे नाव रातोरात बदलून जेटलींचे नाव त्याला दिले तेव्हाही बेदी यांनी तीव्र विरोध केला होता. आता मात्र त्यांनी राजीनामास्त्र उगारले आहे. जेटली यांचे पुत्र व ‘डीडीसीए’चे सध्याचे अध्यक्ष रोहन जेटली यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारी समितीने जेटलींचा पुतळा या मैदानात उभारण्याचे ठरविले. याची माहिती कळताच बेदी यांच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी संघटनेला पत्र लिहून या निर्णयाचा निषेध केला.
बेदी यांच्या सन्मानार्थ कोटला मैदानातील एका स्टॅंडला २०१७ मध्ये त्यांचे नाव देण्यात आले होते. दिवंगत जेटली १९९९ ते २०१३ अशी तब्बल १४ वर्षे ‘डीडीसीए’चे अध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांत कीर्ती आझाद आदींसह बेदी हेही होते.
घरात घुसून 22 वर्षीय तरुणीचे अपहरण; मुख्यमंत्र्यांनी गाठलं पोलिस मुख्यालय
रोहन जेटली यांना लिहिलेल्या पत्रात बेदी यांनी म्हटले आहे, ‘‘क्रिकेटपटूंच्या वर प्रशासकांना का ठेवले जात आहे? मी सहनशील व्यक्ती आहे. पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत होत आहे. कदाचित मी जुन्या मताचा असेन, पण पुतळा उभारण्याच्या तुमच्या निर्णयाविरुद्ध मी अत्यंत विचारपूर्वक संघटनेचे सदस्यत्वही सोडत आहे व स्टॅंडला दिलेले माझे नाव तत्काळ हटवावे असा आग्रह मी करतो. ज्या मूल्यांना कायम ठेवून मी आयुष्यभर क्रिकेट खेळलो त्या मूल्यांवर क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर चार दशकांनंतरही मी ठाम आहे’’
हे वाचा - जम्मू-काश्मीरच्या जनतेने फुटीरतावाद्यांच्या कानशिलात लगावली; निकालानंतर भाजपची प्रतिक्रिया
...ते काम संसदेचे
‘‘दिवंगत अरुण जेटली हे राजकीय नेते होते व त्यांच्या आठवणी जपणे हे संसदेचे काम आहे. तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला हे सांगणारही नाहीत की लॉर्डसवर डब्ल्यू. जी. ग्रेस, ओव्हलवर सर जॅक हॉब्स, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सर डॉन ब्रॅडमन, बार्बाडोस मैदानावर सर गॅरी सोबर्स आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर शेन वॉर्न यांचे पुतळे उभारलेले आहेत,’’ असाही टोला बिशनसिंग बेदी यांनी रोहन जेटली यांना लिहिलेल्या पत्रात लगावला आहे.