esakal | Hathras - आरोपींना ठेवलेल्या तुरुंगात पोहोचले भाजप खासदार
sakal

बोलून बातमी शोधा

Rajveer diler

एकीकडे या प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट असताना दुसरीकडे भाजपचे काही आमदार आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसून आले.

Hathras - आरोपींना ठेवलेल्या तुरुंगात पोहोचले भाजप खासदार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हाथरस प्रकरणावरुन देशातले वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे या प्रकरणावरुन संतापाची लाट असल्याने आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी आहे. तर दुसरीकडे भाजपचे काही आमदार आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसून आले. त्यांच्या या वक्तव्यावरुन वातावरण आणखीनच तापलं यात शंका नाही. मात्र, अशातच भाजपचे खासदार राजवीर सिंह दिलेर यांनी हाथरस प्रकरणातील मुख्य चार आरोपी असलेल्या तुरुंगाला भेट दिली आहे. 

हेही वाचा - 'नितीश कुमार यांना आम्ही हरवणार नाही तर...'; चिराग पासवान यांचा हल्लाबोल

हाथरस येथे 19 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करुन तिच्या मणक्याचे हाड मोडले होते आणि तीची जीभ कापण्यात आली होती. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन देशातील वातावरण चिघळलेले असताना माध्यमेच नव्हे तर विरोधी पक्षांकांनाही पीडितेच्या कुंटुंबाला भेटण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी मोठ्या झटापटीनंतर पोलिसांशी दोन हात करून पीडितेच्या कुंटुंबियांची भेट घेतली. 

मात्र, अशातच भाजपचे खासदार असणाऱ्या राजवीर सिंह दिलेर यांनी आरोपी असलेल्या तुरुंगाला भेट देण्यावरुन टिकेची झोड उडत आहे. अशाप्रकारे आरोपी असणाऱ्या तुरुंगाला भेट देणं हे सर्वात आक्षेपार्ह काम आहे, असं काँग्रेसने म्हटले आहे. राजवीर यांनी भेट दिल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, मी  कोणत्याही कैद्याची भेट घेण्यासाठी गेलो नव्हतो. अलीघरच्या वरिष्ठ पोलिस अधिक्षकांना भेटण्यासाठी गेलो होतो. मात्र, ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेलो त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची भेट घेता आली नाही. मी माझ्या समर्थकांच्या एका कामाबाबतीत एसएसपींच्या घरी गेलो होतो. आणि तिथून येताना तुरुंगाबाहेर वाटेत समर्थक भेटले. चर्चा करत असतानाच तुरुंग प्रशासनासाठी काम करणाऱ्या जेलरने मला चहापाण्यासाठी बोलावले, असा दावा या खासदारांनी केला आहे. 

हेही वाचा - सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षड्यंत्र; 80 हजार फेक अकाउंटचा वापर

मोदींचं मौन का?
देशात इतकी मोठी घटना घडूनही नरेंद्र मोदी गप्प का आहेत, असा सवाल काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केला आहे. मोदींनी आता 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा बदलून आता 'शट अप इंडिया, हशअप इंडिया' ही नवीन घोषणा द्यावी, अशी सुचनाही त्यांनी केली आहे. मोदी इतरवेळी स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या प्रश्नावर बोलत असतात मात्र आता देशात इतकी मोठी घटना कडून वातावरण तापूनही मोदी मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत. या मौनामुळे मोदी यांची दांभिकता उघड झाली आहे, असं ट्विट चौधरी यांनी केलं आहे.