भाजपची आजपासून परिवर्तन यात्रा

पीटीआय
Saturday, 6 February 2021

पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवरुन भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसवरुन राजकीय संघर्ष पेटला आहे.नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची रथयात्रा पाच टप्प्यात आणि राज्यातील २९४विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे.

नवी दिल्ली - आगामी विधानसभेच्या पाश्‍‍र्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (ता. ६) भाजपची पश्‍चिम बंगालमध्ये राज्यव्यापी परिवर्तन यात्रा सुरू होत आहे. नदिया येथून नड्डा यांचा रोड शो सुरू होणार होऊन त्याचा समारोप माल्दा येथे होणार आहे. याशिवाय नड्डा हे नबाद्विप येथील श्री श्री गौरंगा जन्मस्थानम येथे कृषक सुरोखा सहा-भोज येथे उपस्थित राहणार आहेत. 

पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवरुन भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसवरुन राजकीय संघर्ष पेटला आहे. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची रथयात्रा पाच टप्प्यात आणि राज्यातील २९४ विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे. प्रत्येक यात्रेत नव्याने रथ सामील होणार आहे. प्रत्येक यात्रेचा कालावधी हा २० ते २५ दिवसांचा आहे. महिनाभर चालणाऱ्या रथयात्रेत भाजपचे आघाडीचे नेते सामील होणार आहेत. रथयात्रेवरुन बंगालचे राजकारण तापले असून भाजपकडून रथयात्रेची तयारी केली जात असताना तृणमूलकडून परवानगी दिली जात नसल्याचे चित्र आहे. याबाबत भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय म्हणाले, की न्यायालयाने रथयात्रेला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन ही यात्रा रोखू शकणार नाही. विरोधी पक्ष म्हणून जनतेत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे ते म्हणाले. ६ फेब्रुवारीला नड्डा यात्रेचे उदघाटन करणार असून ११ फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शहा कुचबिहार येथील एका रथात सामील होतील.

'कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले'; दिग्विजय सिंहांचा रोख कुणाकडे?

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याला धमकी
शांतीपूर : तृणमूल कॉंग्रेसचे माजी आमदार अरिंदम भट्टाचार्य यांना आज जीवे मारण्याची धमकी आली. त्यांनी काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन ठिकाणी बंगाली भाषेत त्यांना धमकी देण्यात आली आहे. शांतीपूरच्या बागडेबी भागात आणि बगाच्रा येथे त्यांना धमकीवजा वाक्य लिहलेली आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ही बाब भट्टाचार्य यांना कळवण्यात आली. आठवडाभरात शांतीपूर सोडून द्या नाहीतर तुमच्या मृत्यूस तुम्हीच जबाबदार राहाल, असे म्हटले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना वाय श्रेणीची संरक्षण सेवा देण्यात आली आहे.

'आंदोलक शेतकरी काय पाकिस्तान-चीनमधून आले आहेत का?' उपमुख्यमंत्री अजित पवार मोदी सरकारवर बरसले​

पश्‍चिम बंगाल सरकारने कोणत्याही यात्रेला परवानगी नाकारलेली नाही. बंगाल भाजपने केलेल्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य आणि सत्य नाही. परवानगी नाकारल्याचे पुरावे बंगाल सरकारला द्यावे लागतील. भाजप स्वत:ला पीडित असल्याचे दाखवत आहे. 
- तृणमूल कॉंग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Parivartan Yatra from today