भाजपचा व्हर्च्युअल सभांचा धडाका; महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी? 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारसाठी, तर आज ओडिशासाठी, तर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज महाराष्ट्रासाठी अशा व्हर्च्युअल सभा घेतल्या.

नवी दिल्ली, ता. ८ : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अद्याप कोरोनावर औषध सापडलं नसल्यानं सोशल डिस्टन्सिंग पाळूनच आता व्यवहार करावे लागणार आहेत. सर्वच क्षेत्रात हे कटाक्षानं पाळावं लागणार आहे. दरम्यान, राजकारणात आता भाजपने व्हर्च्युअल सभा घेण्यास सुरुवात केली आहे. बिहार आणि ओडिसा राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार आणि ओडिसासाठी व्हर्च्युअल सभा घेतली. तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी महाराष्ट्रासाठी सभा घेतली. यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ची तयारी? 
अमित शहा यांनी काल बिहारसाठी, तर आज ओडिशासाठी, तर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज महाराष्ट्रासाठी अशा व्हर्च्युअल सभा घेतल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा किंवा अगदी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यापैकी कुणीही महाराष्ट्रात व्हर्च्युअल सभा घेतली नाही. या सर्वांना वगळून राजनाथसिंह यांनी महाराष्ट्राला संबोधित करणे हे थोडे अतर्क्य वाटणारे आहे. मात्र, भाजपच्या अंतस्थ योजनेनुसार कोरोनाचा कहर संपल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील प्रस्तावित ‘ऑपरेशन कमळ’ चे ते एक द्योतक मानले जाते. त्यामुळे हे भाजपच्या धक्का तंत्राचा भाग असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री 83 दिवस घरात? लालूंचा भोजपुरी भाषेत टोला

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पुढच्या आठवड्यात बिहारमधील एनडीए प्रचाराचा शुभारंभ अशाच व्हर्च्युअल रॅलीने करणार असून ती पाहणाऱ्यांची संख्या किमान एक कोटी इतकी असावी असे भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपच्या दाव्यानुसार शहा यांनी काल घेतलेली जनसंवाद सभा ऐकणाऱ्यांची संख्या ५४ लाख ३२ हजार ७१६ होती. राजकीय क्षेत्रात जाहीर सभांचे महत्त्व वेगळे असते. मात्र प्रत्यक्षात अशा सभांसाठी येणारा खर्च, त्यासाठीची साधने यांचा खर्च मोठा असतो. लोकांना सभास्थळी आणणेदेखील महत्वाचे असते. त्या तुलनेत व्हर्च्युअल सभा घेणे हा कमी खर्चाचा प्रकार असे भाजपच्या हिशोब नेतृत्वाच्या लक्षात आले आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी सरकारचं आणखी एक पाऊल; लाँच केले एक जबरदस्त अॅप

दिवंगत प्रमोद महाजन यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दाखवलेल्या हायटेक प्रचाराच्या तसेच ‘तंत्रज्ञान आधारित पक्षबांधणी’ या वाटेने पुढे जाताना मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला व्हर्च्युअल सभा - बैठका - मेळावे घेण्याचा नवीन पंथ सापडला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही मोठी असून त्यातदेखील १८ कोटी सदस्यांच्या भाजपा पाठीराख्यांचा वाटा जास्त आहे. 

सोनिया गांधींच्या आग्रहाला माजी पंतप्रधानांनी दिला मान; लढणार राज्यसभा निवडणूक

भाजपच्या दाव्यानुसार गृहमंत्री अमित शहा यांनी काल बिहारसाठी घेतलेली जनसंवाद सभा ऐकणाऱ्यांची एकुण संख्या ५४ लाख ३२ हजार ७१६ आहे. या सभेचे ५३ फेसबुक पेजेसवरून थेट प्रसारण करण्यात आले होते, त्याद्वारे २२ लाख १४ हजार १३६ लोकांनी सभा पाहिली. बिहारमधील सात प्रादेशिक वाहिन्यांवरूनही प्रसारण झाले, ४४ लाख ७१ हजार ५०० व्ह्यूज मिळाले आहेत. बिहारमधील एकुण ३० हजार ९० बुथवर शहा यांच्या भाषणाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp virtual meetings by top leaders on bihar and odisha election