भाजप बजेटचीही करणार जाहिरातबाजी; नेत्यांना दिलेत आदेश ​

टीम ई सकाळ
Thursday, 4 February 2021

केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला सादर केला. या अर्थसंकल्पाचे फायदे जनतेला सांगण्यासाठी आता भाजप मोहिम सुरू करणार आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारीला सादर केला. या अर्थसंकल्पाचे फायदे जनतेला सांगण्यासाठी आता भाजप मोहिम सुरू करणार आहे. यासाठी भाजपकडून देशभरात मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांना देशाच्या सर्व राज्यातील राजधानी आणि मोठ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद आणि सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

अर्थसंकल्पावर भाजपची ही मोहिम 6-7 फेब्रुवारी आणि 13 -14 फेब्रुवारीला राबवली जाणार आहे. सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते 6-7 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतील. तर देशव्यापी मोहिमेमध्ये चर्चासत्र, एफआयसीसीआय आणि चेंबर ऑफ कॉमर्ससह औद्योगिक क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा केली जाणार असल्याचं वृत्त न्यूज 18 ने दिलं आहे.

हे वाचा - Farmer Protest:खासदार शेतकऱ्यांच्या भेटीविनाच परतले; पोलिसांनी परवानगी नाकारली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व खासदारांना फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सांगितलं आहे. त्यामध्ये जनतेला अर्थसंकल्पाचे फायदे सांगण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमातून बाजपच्या नेत्यांना अर्थसंकल्पातील तरतुदी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय आहे. 

हे वाचा - गडकरींच्या मंत्रालयाने तोडला जागतिक विक्रम; 24 तासांत बनवला सर्वाधिक लांबीचा रस्ता

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  कौतुक केलं होतं. कोरोनाच्या संकटकाळातील हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचं व्हिजन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी अर्थसंकल्पात अनेक तरतुदी आहेत. त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला असून बाजारसमित्यांना आणखी बळ मिळेल अशी तरतूद केली असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp will start campaign give information about budget