भाजपची आंदोलनविरोधी मोर्चेबांधणी

नवी दिल्ली - गाझीपूर सीमेपाशी आंदोलक शेतकरी सभेतील नेत्याचे भाषण ऐकताना. (एएनआय)
नवी दिल्ली - गाझीपूर सीमेपाशी आंदोलक शेतकरी सभेतील नेत्याचे भाषण ऐकताना. (एएनआय)

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधात चाललेल्या अपप्रचार रोखण्यासाठी पक्षनेत्यांनी आगामी १० ते १५ दिवस ग्रामीण भागात राहून कृषी कायद्यांच्या फायद्यांबाबत जनजागृती करावी असे निर्देश भाजप नेतृत्वाने आपल्या लोकप्रतिनिधींना दिले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेश, हरियाना व राजस्थानातील खासदार-आमदार व पक्षनेत्यांची बैठक काल (ता. १६) रात्री बोलावली होती. गृहमंत्री अमित शहा व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनीही बैठकीला हजेरी लावली. दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला पंजाब, हरियाना, राजस्थान व विशेषतः पश्‍चिम उत्तर प्रदेशातील जाटबहुल भागात बसण्याची चिन्हे असल्याचे एकामागोमाग एक फीडबॅक दिल्लीकडे येऊ लागल्यावर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने तिन्ही राज्यांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही बैठक पार पडली. पंजाब व हरियानात भाजपला आतापावेतो फारशी आशादायक परिस्थिती नसली तरी अन्य दोन राज्यांत शेतकरी आंदोलनाचा फटका मतपेटीतून बसू नये यासाठी पक्षाने चालू केलेल्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणजे ही बैठक होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेश असो की हरियाना, तेथील जाट-गुजर मतपेढी हा भाजपचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा प्रचंड मोठा आधार ठरली आहे व उत्तर प्रदेश, हरियानातील मागील निवडणुकांतही हेच दिसले होते. मात्र शेतकरी आंदोलनानंतर जाट मतदार भाजपपासून झपाट्याने दूर जाऊ लागल्याची भीती व्यक्त होते. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये विनाकारण गैरसमज पसरविले जात असल्याची मनोभूमिका भाजप नेतृत्वाने कायम ठेवली आहे. हे कायदे रद्द होणार नाहीत यावरही पक्षनेतृत्व ठाम आहे. मात्र याचा राजकीय फटका बसण्याचीही भीती व्यक्त होते.

सूत्रांच्या माहितीनुसार शहा यांनी पक्षनेत्यांना कृषी कायद्यांवर जागृतीच्या सूचना देतानाच, डाव्या पक्षांची विनाशकारी विचारसरणी व त्यातून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर जोरदार टीकास्त्र सोडले. डाव्यांसह विरोधक आंदोलनाचा राजकीय फायदा उपटण्याची धडपड करत आहेत. ती वेळीच हाणून पाडावी. मोदींच्या नेतृत्वावर आजही जनतेचा मोठा विश्‍वास असल्याने डाव्यांचे कारस्थान उधळून लावणे फारसे अवघड नाही. फक्त पक्षाच्या आमदार-खासदारांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद चालू ठेवला पाहिजे, असेही मत शहा यांनी मांडल्याचे कळते.

आंदोलनाचे केंद्र गाझीपूरकडे
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नवसंजीवनी दिल्यावर आंदोलनाचे केंद्र उत्तर प्रदेशातील गाझीपूरकडे सरकले. पहिल्या दोन्ही सीमांवरील आंदोलक शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वृत्त असून याच ठिकाणच्या आंदोलनांवर डाव्या पक्षांची जबर पकड आहे. टिकैत व मोदी यांचे संबंध यापूर्वी सातत्याने सलोख्याचे राहिले आहेत. शेतकरी आंदोलन गाझीपूरकडे सरकणे हे भाजपसाठी एकप्रकारे दिलासादायकही आहे. तरीही पक्षनेत्यांनी गाफील न राहता कृषी कायद्यांच्या फायद्यांबाबत गावागावांत जाऊन जागृती करण्याची रणनीती पक्षाने आखल्याचे कालच्या बैठकीतून समोर आले. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com