CAA : कर्नाटकात निदर्शने सुरूच; मंगळुरात तणावपूर्ण शांतता!

वृत्तसंस्था
रविवार, 22 डिसेंबर 2019

मंगळुरातील पोलिस गोळीबारात मरण पावलेल्यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे.

बंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ सुरू असलेले आंदोलन शनिवारी (ता.21) राज्याच्या विविध भागांत सुरू होते. लोकांनी निदर्शने करून व बंद पाळून विधेयकाचा निषेध केला. मंगळूरमधील पोलिस गोळीबाराच्या निषेधार्थ मडिकेरी येथे बंद पाळण्यात आला, तर कोप्पळ येथे निदर्शने करण्यात आली. गुलबर्गा येथेही निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बंगळूर येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने निदर्शने करून आक्रोश व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी मंगळूर येथे झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात तणावपूर्ण स्थिती आहे. संचारबंदी आज दुपारी तीन ते सहा या वेळेत शिथिल करण्यात आली व लोकांना या अवधीत त्यांचे व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली.

- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

दरम्यान, सकाळी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. मंगळूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. 

मडिकेरी येथे मंगळूरमधील पोलिस गोळीबाराच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. कोप्पळ येथे निदर्शने करण्यात आली. राजधानी बंगळूर येथेही बंदी आदेश असतानाही अनोख्या पद्धतीने निदर्शने करण्यात आली. मंगळूर शहरातील संवेदनशील भागात जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात 144 कलम जारी करण्यात आले आहे. 

- मोदींच्या 'स्कील इंडिया'चा बोजवारा; ट्रेनिंग दिलेल्यांपैकी 25 टक्के तरुणांनाही नोकऱ्या नाहीत

सिद्धरामय्यांना बंदी 

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंगळूर पोलिसांनी मंगळूरला भेट देण्यावर आजही बंदी घातली. त्यांना नोटीस जारी करून मंगळूरला सद्यःस्थितीत न येण्याची विनंती केली. संचारबंदी असल्याने सिद्धरामय्या यांना भेट देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

- भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई

पूर्वनियोजित हत्येचा आरोप 

मंगळुरातील पोलिस गोळीबारात मरण पावलेल्यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे. काही मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना, भाजप सरकारने केलेली ही नियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे. निदर्शनाच्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक लोक नव्हते, त्यामुळे तेथे गोळीबार करण्याची परिस्थितीच नव्हती, असा दावा त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA Protests continue in Karnataka and Stressful peace in Mangaluru