हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश

वृत्तसंस्था
Saturday, 21 December 2019

दुसऱ्यांदा शवविच्छेदन केल्यानंतर प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे डॉक्‍टरांनी आपले स्वतंत्र मत मांडावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. 

हैदराबाद : कथित पोलिस चकमकीत ठार झालेल्या हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा आदेश तेलंगण उच्च न्यायालयाने शनिवारी (ता.21) दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा डिसेंबर रोजी झालेल्या पोलिस चकमकीत चार आरोपींचा मृत्यू झाला होता. डॉक्‍टर असलेल्या तरुणीवर या चार आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या मालकीच्या रुग्णालयात या चारही आरोपींचे मृतदेह सध्या ठेवण्यात आले आहेत. ही पोलिस चकमक बनावट असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने मृतदेहांचे जतन करण्याचा आदेश दिला होता. 

- 'गांधीगिरी' संदर्भात अमेरिकेच्या संसदेत मोठा निर्णय!

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन करण्याचा आदेश आज दिला. त्यासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन तज्ज्ञांचे पथक स्थापन करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. आरोपींच्या मृतदेहांचे दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्यात यावी, असेही न्यायालयाने नमूद केले. 

- CAA : दिल्ली हिंसाचारप्रकरणी 'भीम आर्मी' प्रमुख अटकेत!

या शवविच्छेदनाचा अहवाल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे सादर करावा. दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर चारही आरोपींचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांकडे सोपवावेत, असे न्यायालयाने सांगितले. 

सर्व साहित्य ताब्यात घ्या! 
दुसऱ्यांदा शवविच्छेदन केल्यानंतर प्राप्त झालेल्या पुराव्यांच्या आधारे डॉक्‍टरांनी आपले स्वतंत्र मत मांडावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. 

- मोदींच्या 'स्कील इंडिया'चा बोजवारा; ट्रेनिंग दिलेल्यांपैकी 25 टक्के तरुणांनाही नोकऱ्या नाहीत

या प्रकरणाशी संबंधित सर्व साहित्य, केस डायरी, पोलिस अधिकाऱ्यांच्या हालचालींच्या नोंदी, या चकमकीत पोलिसांनी वापरलेल्या शस्त्रांची यादी आदी ताब्यात घ्यावे, असा आदेश न्यायालयाने राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Telangana High Court orders for re postmortem of bodies of accused in encounter