esakal | मंत्रिमंडळ समित्यांमध्येही फेरबदल; वगळलेल्या मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्रिमंडळ समित्यांमध्येही फेरबदल; वगळलेल्या मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री

मंत्रिमंडळ समित्यांमध्येही फेरबदल; वगळलेल्या मंत्र्यांच्या जागी नवे मंत्री

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्रिमंडळातील समित्यांमध्येही फेरबदल झाला आहे. सरकारचे राजकीय धोरण ठरविणाऱ्या राजकीय व्यवहार विषयक समितीमध्ये स्थान देऊन स्मृती इराणींना बढती देण्यात आली आहे. दरम्यान, अन्य समित्यांत जुन्या मंत्रिमंडळातील डच्चू मिळालेल्या मंत्र्यांच्या जागी नव्या मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये नारायण राणेंसह, ज्योतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडाविया, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव या नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत ३० कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि ४५ राज्यमंत्री अशा ७७ जणांचे मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे सदस्य आहेत. तर, पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश असलेली मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समिती देखील जैसे थेच आहे.

हेही वाचा: NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर

हरदीपसिंग पुरी निवासविषयक समितीचे सदस्य

पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना निवासविषयक मंत्रिमंडळ समितीचे (कॅबिनेट कमिटी ऑन अकोमोडेशन) सदस्य बनविण्यात आले आहेत. या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे सदस्य आहेत. तर, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह हे या समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत.

आर्थिक व्यवहार समितीवर अद्याप नेमणूक नाही

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीमध्ये रविशंकर प्रसाद आणि सदानंद गौडा या दोन माजी मंत्र्यांना वगळल्यानंतर रिक्त झालेल्या स्थानावर अन्य कोणत्याही मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे राजनाथसिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंह तोमर, डॉ. एस. जयशंकर आणि धर्मेंद्र प्रधान हे सदस्य आहेत.

हेही वाचा: साताऱ्याच्या ऑलिम्पियनचे आई-वडील खरे चॅम्पियन; PM मोदींची दाद

संसदीय व्यवहार समिती

संसद अधिवेशनाचे वेळापत्रक तसेच संसदेत मांडावयाच्या विधेयकाबाबत निर्णय करणाऱ्या संसदीय व्यवहार विषयक समितीचा विस्तार करण्यात आला असून सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार आणि माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह कायदा मंत्री किरेन रिज्जिजू, आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

राजकीय व्यवहार समिती

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राजकीय व्यवहार समितीमध्ये महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना बढती मिळाली आहे. ताज्या विस्तारामध्ये स्मृती इराणींना वस्त्रोद्योग मंत्रालय गमवावे लागले होते. त्यांच्यासोबतच तसेच नवे जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल, ग्रामविकास मंत्री गिरिराजसिंह यांच्यासह आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, श्रममंत्री भूपेंद्र यादव यांचीही या समितीमध्ये वर्णी लागली आहे.

हेही वाचा: प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

गुंतवणूक आणि विकास समितीवर राणे, शिंदे

गुंतवणूक आणि विकास विषयक मंत्रिमंडळ समितीचा विस्तार करून त्यात मध्यम आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे, विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्थान देण्यात आले आहे. १००० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणुकीच्या प्रकरणांवर ही समिती निर्णय करत असते. पायाभूत सुविधा, उत्पादन तसेच अन्य क्षेत्रांबाबत या समितीचा निर्णय महत्त्वाचा असतो. यासोबतच रोजगार आणि कौशल्य विकास विषयक समितीमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि श्रममंत्री भूपेंद्र यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, महेंद्रनाथ पांडेय हे या समितीचे सदस्य होते. त्यातील पोखरीयाल आणि गंगवार यांना मंत्रिमंडळातून नारळ मिळाला आहे. तर महेंद्रनाथ पांडेय यांना अवजड उद्योग मंत्रालय मिळाले आहे.

loading image