'लॉकडाऊनचा देशाला नक्की काय फायदा झाला?'

वृत्तसंस्था
Wednesday, 16 September 2020

देशात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ लागल्यानंतर सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. पण, या लॉकडाऊनचा नक्की काय आणि कसा फायदा झाला हे सरकारने सदस्यांना सांगावे,' अशी मागणी काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी केली.

नवी दिल्लीः देशात कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ लागल्यानंतर सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. पण, या लॉकडाऊनचा नक्की काय आणि कसा फायदा झाला हे सरकारने सदस्यांना सांगावे,' अशी मागणी काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी केली.

शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या खासदाराला कोरोनाची लागण

पावसाळी आधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज आज (बुधवार) सुरु झाले. राज्यसभेमध्ये करोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भात चर्चा झाली. देशातील करोनाबाधितांच्या आकड्याने ५० लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर काँग्रेसने सरकारवर निशाणा साधताना माहिती देण्यास सांगितले. यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सरकारी बाजू मांडून माहिती दिली.

'लॉकडाउनमध्ये किती प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला?'

आनंद शर्मा म्हणाले, 'आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या निर्णयामुळे करोनाबाधितांचा आकडा १४ ते २९ लाखांदरम्यान संथ गतीने वाढला तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या ३७ हजार ते ७८ हजारांपर्यंतच मर्यादित राहिली. मात्र, या आकडेवारीमागे काही वैज्ञानिक कारण आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे. कोणत्या आधारावर हे आकडे सांगण्यात आले आहेत, याचाही खुलासा करवा. सरकारने चार तासांचा अवधी देत लॉकडाऊनची घोषणा केली. यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. संपूर्ण जगाने भारतातील ही परिस्थिती पाहिली आहे, त्याकडे कानाडोळा करता येणार नाही. लॉकडाऊनदरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू झाला आहे. पण, सरकारकडे याबाबतची आकडेवारी नाही. खरंच, हे खूपच दूर्देवी आहे. यापुढे प्रवासी मजुरींसंदर्भातील आकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी एक राष्ट्रीय डेटा बेस तयार करण्यात यावा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: center should tell how lockdown benefited india during coronavirus at rajasabha