मास्क, सॅनिटायझरला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले; त्यामुळे काय होणार घ्या जाणून...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 13 मार्चला मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला होता. पुढील 100 दिवसांसाठी म्हणजे 30 जूनपर्यंत या वस्तू अत्यावश्यक असतील, असे मंत्रालयाने जाहीर केले होते.

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असताना मास्क आणि सॅनिटायझर यांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहे. देशभरात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कारण देत, ही दोन्ही साधने अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचे आदेश केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिले आहेत. त्यामुळे किमतीवर कोणतेही नियंत्रण राहणार नसल्याने मास्क आणि सॅनिटायझर पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. 

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 13 मार्चला मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये केला होता. पुढील 100 दिवसांसाठी म्हणजे 30 जूनपर्यंत या वस्तू अत्यावश्यक असतील, असे मंत्रालयाने जाहीर केले होते. राज्य सरकारांची मते घेतल्यानंतर या अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी दिली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे या दोन्ही वस्तूंच्या किमतीवरील निर्बंध हटले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महत्त्वाचे ठरलेले मास्क आणि सॅनिटाझर यांना अत्यावश्यक वस्तूंमधून वगळल्याने किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाला आरोग्य क्षेत्रातून विरोध केला जात आहे.

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये

देशभरात या दोन्ही वस्तूंचा साठा उपलब्ध आहे. किमतीही नियंत्रणात असल्याने आता या वस्तूंना अत्यावश्यक यादीत ठेवणे गरजेचे नसल्याचे केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे 1 जुलैपासून हा नियम लागू झाल्याने अत्यावश्यक वस्तू व सेवा कायद्यांतर्गत (1955) या वस्तूंचे निश्चित केलेले दरही आता लागू नाहीत, असे सांगण्यात आले.

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

दरम्यान, महाराष्ट्रात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) स्पष्ट केले. मागणीपेक्षा साठा अधिक असून, उत्पादक आणि विक्रेते कमी किंमत लावत आहेत. केंद्राने 15 ते 20 दिवसांपूर्वी मास्क आणि सॅनिटायझरबाबतीत माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात मास्क आणि सॅनिटायझरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. 

'डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही' : अजित पवार

किमती वाढणार नाहीत!
निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा कमी दराने मास्क आणि सॅनिटायझर बाजारात उपलब्ध आहेत. आता या दोन्ही वस्तूंची किंमत वाढणे अशक्य आहे, असे राज्य अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त जुगलकिशोर मंत्री म्हणाले. राज्यातील 110 साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यात दोन स्तर, तीन स्तरांचे 90 लाख मास्क आणि एन-95 प्रकारच्या 22 लाख मास्कचा साठा आहे. उत्पादकांकडे पाच लाख 71 हजार लिटर आणि बाजारात 11 लाख लिटर सॅनिटायझर उपलब्ध आहे. राज्यभरात पुरेसा साठा असल्यामुळे या दोन्ही वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government removes mask and sanitizer from essential goods list, what will happens next read full story..