Article 370 : काश्‍मीरमध्ये सोमवारपासून 'रिंग' वाजणार!

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल 70 दिवसांनंतर मोबाईल सेवा सुरवात होत आहे.

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये येत्या सोमवारी (ता.14) दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती शनिवारी (ता.12) जम्मू-काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली. राज्यात सुमारे 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. मात्र, इंटरनेट आणि प्रीपेड मोबाईलची सेवा अद्याप बंदच राहणार आहे. 

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल 70 दिवसांनंतर मोबाईल सेवा सुरवात होत आहे. काश्‍मीर खोऱ्यात एकूण 66 लाख मोबाईलधारक असून, त्यापैकी 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. जम्मू काश्‍मीरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे कन्सल यांनी सांगितले.

- स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा..

येत्या 14 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 नंतर पोस्टपेड सेवा सुरू होईल, असे त्यांनी नमूद केले. हा निर्णय राज्यातील सर्व दहा जिल्ह्यांना लागू असणार आहे. जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच पर्यटकांवरची बंदी हटविली असून, शाळा आणि महाविद्यालयेही सुरू केली आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांत उपस्थिती खूपच नगण्य दिसून येत आहे.

मोबाईल सेवा सुरू झाल्याने पर्यटक राज्यातील कोणत्याही भागातून घरी संपर्क करू शकतील, काश्‍मीर खोऱ्यातील विद्यार्थीही पालकांच्या संपर्कात राहू शकतील आणि व्यावसायिकही ग्राहकांशी संवाद करू शकतील, असे कन्सल म्हणाले. काश्‍मीरमध्ये पर्यटकांचे स्वागत असून, केवळ पर्यटनस्थळी पर्यटकांच्या मदतीसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

- Vidhan Sabha 2019 : भाजपकडून मेगाभरतीचा गाजावाजा पण बंडखोर आमदारांचे काय?

जम्मूतही बहाल केली होती सेवा 

काश्‍मीर खोऱ्यात 17 ऑगस्ट रोजी लॅंडलाइन सेवा कमी प्रमाणात सुरू केली होती आणि 4 सप्टेंबरपर्यंत 50 हजार लॅंडलाइन सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. जम्मूत दूरध्वनी सेवा काही दिवसांतच बहाल करण्यात आली, तर मोबाईल इंटरनेट सेवा ही ऑगस्टच्या मध्यान्ही सुरू केली. मात्र, दुरपयोग होऊ लागल्याने इंटरनेट सेवा 18 ऑगस्टला बंद केली. 

जम्मू-काश्‍मीर खोऱ्यातील 99 टक्के निर्बंध हटविण्यात आले आहेत. आठ ते दहा पोलिस ठाण्यातंर्गत असलेले निर्बंधही आता पूर्णपणे काढण्यात आले आहेत. नजरकैदेतील राजकीय नेत्यांच्या मुक्ततेबाबत प्रशासनाकडून सुरक्षा आढावा घेतला जात आहे. 
- रोहित बन्सल, राज्याचे मुख्य सचिव

- Vidhan Sabha 2019 : 'सर्वकाही शिवसेना आमदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठीच!' : आदित्य ठाकरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Secretary of Jammu and Kashmir said that mobile postpaid service will be operational in Kashmir from Monday