मोदी, सीतारामन यांना संकटाचे गांभीर्य नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 13 October 2019

सरकारने आपल्या संस्थांना करवसुलीऐवजी राजकीय विरोधकांवर कारवाईचे काम दिले आहे. सूडभावनेने कामकाज सुरू आहे.

नवी दिल्ली : देशासमोर असलेल्या आर्थिक संकटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अजिबात गांभीर्य नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या चार महिन्यांत बेरोजगारी वाढली असून, केवळ वाहन उद्योग क्षेत्रात 35 लाखांहून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या असल्याचा हल्लाही काँग्रेसने चढवला आहे. 

अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असताना कालच जाहीर झालेल्या उत्पादन क्षेत्राच्या घटलेल्या आकडेवारीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि माजी मंत्री आनंद शर्मा यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. उत्पादन क्षेत्रात गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक नीचांकी घट यंदा नोंदविण्यात आली. गुंतवणुकीच्या नावाने ठणठणाट आहे. भांडवली उत्पादनही 21 टक्‍क्‍यांनी घटले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रातील कारखाने बंद पडत आहेत. चर्मोद्योग संकटात आहे.

- भिवंडीतले रस्ते झालेत मृत्यूचे सापळे, आणखी किती जणांना मुकावे लागणार प्राण?

सरकारकडे महसुलाची चणचण आहे, याकडे लक्ष वेधताना शर्मा म्हणाले, की 'जीएसटी'चा परतावा, निर्यातीचा परतावा; तसेच सरकारी क्षेत्रातील उद्योगांच्या देयकांची रक्कम दहा लाख कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. या एकत्रित रकमेचा विचार केल्यास राजकोषीय तूट 3.3 टक्के न राहता ऐवजी आठ टक्‍क्‍यांहून अधिक होणार आहे. 

- स्वीडिश नागरिकाचा विमानतळावर नग्नावस्थेत दंगा...

उद्योग क्षेत्रातील पतपुरवठा 88 टक्‍क्‍यांनी घटल्याचा दावाही शर्मा यांनी केला. बँकांमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईतील पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंकेतील गैरव्यवहारामुळे त्रस्त झालेल्या खातेदारांना अर्थमंत्र्यांकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे; पण समितीद्वारे चौकशी करण्याचे आणि रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करण्याचे सांगून अर्थमंत्री सीतारामन यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

- Vidhan Sabha 2019 : भाजपकडून मेगाभरतीचा गाजावाजा पण बंडखोर आमदारांचे काय?

सरकार संवेदनाहीन असून त्यांना केवळ जनतेचे पैसे घेण्याची माहिती आहे. परत देण्याचे गांभीर्य नाही. दुसरीकडे, सरकारने आपल्या संस्थांना करवसुलीऐवजी राजकीय विरोधकांवर कारवाईचे काम दिले आहे. सूडभावनेने कामकाज सुरू आहे, असाही हल्ला आनंद शर्मा यांनी चढवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress criticized PM Narendra Modi and Nirmala Sitharaman for no seriousness about crisis