जाणून घ्या कोणी दिल्या, काँग्रेसला कोट्यवधींच्या देणग्या?

टीम ई-सकाळ
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पाच पटिने वाढ झालेली दिसून येत आहे. पण, भाजपच्या तुलनेत काँग्रेस यात खूपच मागे असल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : भाजपच्या तुलनेत देशभरात काँग्रेसची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर घटलेली असली तरी, काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टीही घडताना दिसत आहेत. काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये पाच पटिने वाढ झालेली दिसून येत आहे. पण, भाजपच्या तुलनेत काँग्रेस यात खूपच मागे असल्याचे दिसत आहे.

शरद पवार म्हणतात, ‘मला आता आणखी काही नको’

देणग्यांमध्ये झाली वाढ!
काँग्रेसने नुकताच निवडणूक आयोगाकडे आपला ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे. त्यात काँग्रेसला 2018-19मध्ये 146 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात काँग्रेसला फक्त २६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या देणग्यामध्ये पाच पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसला त्यांच्या काही नेत्यांनीही देणग्या दिल्या आहेत. त्यात कपिल सिब्बल यांनी दोन लाख, पवन बन्सल आणि मनिष तिवारी यांनी प्रत्येकी ३५ हजार, तर नवज्योतसिंग सिद्धू दाम्पत्याने ७० हजार रुपये देणगी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, काही बड्या कार्पोरेट कंपन्यांच्या ट्रस्टनी काँग्रेसला मोठ्या देणग्या दिल्या आहेत. पण, देणग्या देणाऱ्या कंपन्यांनी संख्या मात्र घटलेली दिसत आहे.

विधानसभा प्रचाराला मिळणार अवघे १२ दिवस

यांनी दिल्या देणग्या
टाटा उद्योग समूहाचा पाठिंबा असलेल्या दी प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्टने काँग्रेसला सर्वाधिक ५५ कोटी रुपये देणगी दिली आहे. त्या पाठोपाठ भारती एअरटेलच्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने ३९ कोटी रुपये काँग्रेसला दिले आहेत. आदित्य बिर्ला जनरल ट्रस्ट आणि समाज ट्रस्ट यांनी प्रत्येकी दोन कोटी रुपये देणगी दिली आहे. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने त्या आधीच्या वर्षात भाजपला १४४ कोटी तर, काँग्रेसला फक्त १० कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्यात आता ट्रस्टने यंदा मोठी वाढ केली आहे. काँग्रेसला देणगी देणाऱ्यांमध्ये कार्पोरेट हाऊसेस मात्र दिसत नाहीत. या यादीत काही मोजक्या कार्पोरेट कंपन्यांचा समावेश आहे त्यात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर अल्कोब्रू यांनी ७ कोटी रुपये काँग्रेसला दिले आहेत. त्या पाठोपाठ निरमा ग्रुप आणि एचईजी ग्रुपने प्रत्येक अडीच कोटी रुपयांची देणगी काँग्रेसला दिली आहे. गायत्री कन्सट्रक्शन्स, शोभा डेव्हलपर्स तसेच अपर्णा इन्फ्रस्ट्रक्चर हाऊसिंग लिमिटेड या कंपन्यांनी काँग्रेसला नेहमीप्रमाणे देणग्या दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकणारी तरुणी पवारांना भेटली

भाजपचा अहवाल कुठे?
काँग्रेसशिवाय केवळ बहुजन समाज पार्टी या एकमेव राष्ट्रीय पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपला अहवाल सादर केला आहे. त्यात पक्षाने २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी आलीच नसल्याचे म्हटले आहे. भाजपला २०१७-१८मध्ये १ हजार २७ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यातील ७५८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे भाजपने आपल्या अहवालात म्हटले होते. गेल्या आर्थिक वर्षातील अहवाल मात्र, अद्याप भाजपने आयोगाकडे सादर केलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress party got five times more donations compared to previous year